शेगाव तालुक्यात आलीये 'टक्कल साथ'
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये एका विचित्र आजाराने थैमान घातले आहे. या गावांमधील लोकांमध्ये अचानक केसगळती सुरू झाली आहे. लहान मुले, तरुण अगदी महिलांचा देखील यामध्ये समावेश आहे. केसगळती सुरू झाल्यावर अगदी दोन-तीन दिवसांमध्येच टक्कल पडायला सुरूवात होत असल्याने लोक भयभीत झाले आहे.
सविस्तर माहिती अशी की, शेगाव तालुक्यातील तीन गावांमध्ये 'टक्कल व्हायरस' पसरल्याचे बोलले जात आहे. या तीन गावांमधील लोकांमध्ये अचानक केसगळती सुरू झाली आहे. शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा, या गावांमध्ये या अज्ञात आजाराने थैमान घातले. या तीन गावातल्या जवळपास ५० पेक्षा अधिक व्यक्तींना या आजारचा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. लोकांमध्ये अचानक केसगळती होत असून काही दिवसातच त्यांचे चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
View this post on Instagram
मिळालेल्या महितीनुसार, सुरुवातीला डोके खाजवणे, नंतर सरळ केस हातात येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने लोक घाबरून गेले आहे. या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे. तसेच ग्रामस्थ वापरात असलेल्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पाण्याचा अहवाल समोर आल्यावरच याबाबतचे तथ्य समोर येईल. मात्र हा अज्ञात आजार नेमका कोणता आहे, याबाबत सर्वच अनभिज्ञ असल्याने एकच खळबळ उडाली आहे.