पती-पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या
नागपूर शहरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नागपूरमधील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्टीननगर परिसरात ही घटना घडली आहे. जारील ऊर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रिप (वय ५४)आणि पत्नी ॲनी जारील मॉनक्रिप (वय ४५)असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी या दाम्पत्याने व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवले होते. तसेच पोलिसांना त्यांच्या घरात एक सुसाइड नोट देखील आढळली आहे. आर्थिक परिस्थितीला कंटाळून दोघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
मूल होत नसल्याने केली आत्महत्या
जारील आणि ॲनी या दोघांचा प्रेम विवाह होता. दोघेही त्यांच्या संसारात सुखी होते. पण, मुल होत नसल्याने दोघेही नैराश्यात होते. एकमेकांची मने सांभाळत संसाराचा गाडा हाकत होते. कोरोना काळात जारील यांची नोकरी गेली होती. तेव्हापासून ते नैराश्यात होते. काम नसल्याने दोघेही उदास राहत होते. त्यांच्या नातेवाइकांनी अनेकवेळा त्यांची समजूत देखील काढली होती. परंतु, दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
दाम्पत्याने आत्महत्या केल्याचे असे आले उघडकीस
जारील आणि ॲनी यांनी सोमवारी सायंकाळी आपल्या नातेवाईकांशी फोनवर बोलणे केले. तेव्हा सगळे सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते. मध्यरात्री त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजून गेले तरी जारील यांच्या घरातून कोणी बाहेर आले नाही. म्हणून शेजारच्या एका महिलेने त्यांना आवाज दिला. परंतु कोणीही त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्या महिलेने खिडकीतून आत डोकावून बघितले. तेव्हा त्यांना समोर पती-पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी तातडीने शेजारच्या लोकांना कळवले. स्थानिकांनी जरीपटका पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.