हसन मुश्रीफ (वैद्यकीय शिक्षण मंत्री)
सर्व अधिष्ठातांनी सतर्क राहण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : जगातील अनेक देशांमध्ये ह्युमन मेटान्युमो व्हायरस ( एचएमपीव्ही ) विषाणूचा प्रभाव दिसून येत आहे. हा आजार गंभीर नसून लहान मुले, वृद्ध आणि इतर गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांनी काळजी घ्यावी, मात्र घाबरु नये, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. मंत्रालयीन दालनात एचएमपीव्ही विषाणूसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ अजय चंदनवाले, आयुष विभागाचे संचालक डॉ. रमण घुंगराळकर याबरोबरच राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे अधिष्ठाता दुरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.
जगातील अनेक देशांमध्ये ह्युमन मेटान्युमो व्हायरस (एचएमपीव्ही) विषाणूचा प्रभाव दिसून येत आहे. हा आजार गंभीर नसून लहान मुले, वृद्ध आणि इतर गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांनी काळजी घ्यावी, मात्र घाबरुन जाऊ नये, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री @mrhasanmushrif यांनी बैठकीत केले.#HMPV pic.twitter.com/H7nMsmPtEb
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 7, 2025
मंत्री मुश्रीफ म्हणाले,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, काही राज्यांमध्ये एचएमपीव्ही प्रकरणे आढळून आलेली आहेत. परंतू आपल्या राज्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये कारण सरकार लवकरच या परिस्थितीबद्दल सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्वे जारी करुन या रोगाला प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन आळा घालण्यासाठीप्रयत्नशील आहे.
सर्व अधिष्ठातांनी संभाव्य प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी औषधांसह ऑक्सिजन व आवश्यकता वाटल्यास विलगीकरण यासाठी तयारीत रहावे. अतिरिक्त व मुबलक औषधीसाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे संपर्क करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. हा रोग राज्यात पसरु नये यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे व अधिष्ठातांनी सतर्क राहून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द कराव्या, अशा सूचनाही मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.
या रोगासंबंधी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून नागरिकांना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. प्रतिबंधात्मक उपाय व सतर्कतेचा एक भाग म्हणून नागरिकांना खोकताना किंवा शिंकताना तोंड व नाक रुमालाने झाकण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. साबण आणि पाण्याने किंवा सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुणे, ताप व खोकला आणि शिंका अथवा सर्दी सारखी लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन रुग्णांनी सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहावे व वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधी, भरपूर पाणी पिणे आणि पौष्टिक आहाराचे सेवन केल्यामुळे या रोगाचा प्रसार कमी होण्यास मदत होईल. वैद्यकीय शिक्षण विभागाने विशेष करून संशयित रुग्णांपासून दूर राहून सदर रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यास सहकार्य करावे, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.