आमच्यापैकी अनेकांना न्याय मिळाला नाही...
#मुंबई
होईल... लवकरच होईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरात असताना वारंवार मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त पुढे ढकलण्यात येत असल्याने सत्ताधारी वर्तुळातील सदस्यांमध्ये विशेषत: शिंदे गटातील आमदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ‘‘आमच्या ४० आमदारांपैकी अनेकांना न्याय मिळालेला नाही,’’ अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू असलेले उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी (दि. १२) नाराजीचा सूर आवळला.
राज्यात मागील काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगली आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा एक मोठा गट सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या काही आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता उदय सामंत यांच्या एका विधानाची राजकीय वर्तुळात जोररदार चर्चा रंगली आहे. प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आम३दार बच्वू कडू यांच्या नाराजीची दखल घेत सामंत म्हणाले, ‘‘आमच्या ४० पैकी अनेक आमदारांना अद्याप न्याय मिळालेला नाही. बच्चू कडू, राजेंद्र यड्रावकर यांना न्याय मिळाला नाही.’’
‘‘बच्चू कडूंनी आत्तापर्यंत खूप सहकार्य केले. ते माझे ज्येष्ठ सहकारी आहेत. आमच्या सरकारबरोबर त्यांची प्रहार संघटना युतीत आहे. त्यांच्याबरोबर आमचे अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर मंत्री होते. त्यांनाही अद्याप न्याय मिळाला नाही. अन्यही अनेकांना न्याय मिळाला नाही. आमच्या ४० आमदारांपैकीही काही जणांना अद्याप न्यायाची प्रतिक्षा आहे. बच्चू कडूंचा गैरसमज होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. मंत्रिमंडळ विस्तार होईल, तेव्हा एकनाथ शिंदे या प्रकरणी योग्य तो निर्णय घेतील,’’ असे उदय सामंत यांनी नमूद केले.
यावेळी ‘‘शिंदे गटाला सरकारमध्ये वाईट वागणूक मिळते का,’’ असा प्रश्न केला असता त्यांनी सामंत यांनी असे काहीही नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. ते म्हणाले, ‘‘आम्हाला सरकारमध्ये कोणतीही वाईट वागणूक मिळत नाही. इथे मुख्यमंत्रीच शिवसेनेचे आहेत. आमच्या सर्वांचा एकनाथ शिंदेंवर विश्वास आहे. त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील याची मला खात्री आहे.’’
राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांना अर्थमंत्रालय देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे खाते अजित पवार यांना देण्यास शिंदे गटाचा तीव्र विरोध आहे. यासंदर्भात विचारले असता सामंत सूचकपणे उत्तरले, ‘‘अर्थखाते कुणाला द्यावे आणि कुणाला देऊ नये हे सांगण्याएवढे आम्ही मोठे नाही. शिवसेनेच्या सर्व आमदारांचा एकनाथ शिंदेंवर पूर्ण विश्वास आहे. ते जो निर्णय घेतील, तो आमच्या व महाराष्ट्राच्या हिताचा असेल. त्यामुळे आम्ही कुणाला कोणते खाते द्यावे याची चर्चा करत नाही.’’वृत्तसंस्था