संग्रहित छायाचित्र
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. या प्रकरणातील काही आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. सर्व आरोपींना अटक व्हावी. त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे असे जरांगे पाटील म्हणाले. तसेच त्यासाठी राज्यभर मोर्चे सुरू झाल्याचे देखील त्यांनी सांगितले.
जरांगे पुढे म्हणाले, आता पुढच्या काळात सगळे सापडतील. या सगळ्या प्रकरणातील मोठे मासे कोण आहे ते सगळे सापडतील. मंत्री धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात सहभाग आहे की नाही हे चौकशीअंती सिद्ध होईल. आता चौकशी सुरू होईल. अजून काही आरोपी फरार आहेत. त्यांचे सीडीआर काढले जातील. त्यांच्या कॉल डिटेल्सवरून यामागे कोण आहे, खंडणी कोणी मागितली? कोणी मागायला लावली? कोणी खून करायला लावला? आरोपी फरार कोणी केले? आणि सांभाळतंय कोण? या सगळ्या गोष्टींची चौकशी होईल. त्यानंतर ते सगळेच मध्ये येणार आहेत. सगळ्यांना मोक्का सुद्धा लागणार आहे. ३०२ चा गुन्हा सुद्धा लावला जाऊ शकतो. जर सरकारने हे केले नाही, तर मराठे पुन्हा एकदा रस्त्यावर येतील असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मिक कराड मंगळवारी पोलिसांना शरण आला आहे. दरम्यान या प्रकरणातले काही आरोपी फरार आहेत. या प्रकरणावरून राजकारण तापले आहे. 22 दिवस झाले तरी आरोपी सापडले नसल्याने मस्साजोग येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. बुधवारी, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी ‘जलसमाधी’ आंदोलन केले. गावातील महिला आणि पुरुष तलावात उतरले.
काय आहे मस्साजोग प्रकरण?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 ला अपहरण करून निर्घृणपणे खून करण्यात आला. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आली आहे.