संग्रहित छायाचित्र
पुणे: ‘हवा बहुत तेज चल रही है, अजितराव टोपी उड जायेगी’, असा संवाद फेक करत अजित पवारांची नक्कल करुन ‘आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर आधी तुम्हीच पडाल’, असा इशारा शनिवारी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुण्यात दिला. शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना पाडणारच असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गेल्या आठवड्यात दिला होता. त्याचा समाचार घेत राऊत यांनी पवारांची नक्कल करत तेच पडतील असा दावा त्यांनी यावेळी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली तीन काढण्यात आलेल्या शेतकरी आक्रोश मोर्चाची सांगता सभा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाली. राज्यातील शेतकऱ्यांना पिक विमा, शेतकऱ्यांचे प्रश्न, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, सरसकट कर्जमाफी मिळावी या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांच्याकडून शेतकरी आक्रोश मोर्चा २७ डिसेंबर ते ३० डिसेंबर या मध्ये काढण्यात आला होता. त्याप्रसंगी राऊत बोलत होते. राष्ट्रावादीचे नेते आणि खासदार शरद पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, आमदार रवींद्र धंगेकर, संजय जगताप, अशोक पवार, माजी आमदार कमल ढोले-पाटील, कॉंग्रेसचे नेते मोहन जोशी, महादेव बाबर, बाळासाहेब शिवरकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे या वेळी उपस्थित होते. देशामध्ये भाजपचे सरकार येण्याचे कारण ईव्हीएम मशीन आहे. ईव्हीएम मशीन विरहित मतदान झाले तर भाजपला राज्यात साधी ग्रामपंचायत देखील जिंकता येणार नाही. अशी घणाघाती टीकाही राऊत यांनी मोदी सरकारवर केला.
देशाचे पोट भरणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकरी लुटला जात आहे. राज्यातील बेरोजगारी वाढत आहे. प्रत्येक उद्योग गुजरातला जात आहे. त्यापेक्षा एकदा गुजरातला सोन्याने मढवून टाका, म्हणजे तुमचं समाधान होईल. महाराष्ट्रातील तरुणांच्या वाढत्या बेरोजरगरीला आणि होणाऱ्या शेतकरी आत्महत्याना सरकार कारणीभूत आहे. देशातील न्यायव्यवस्थेने आणि तपास यंत्रांनी महाविकास आघाडीला कितीही त्रास दिला तरी आम्ही घाबरणार नाही. आतापर्यन्त या सरकारने अनेक वेळा आम्हाला तपास यंत्रणेसमोर उभे राहण्यास भाग पाडले आहे. परंतु आम्ही न डगमगता आजही उभे आहोत. पंतप्रधानांनी देशातील न्यायव्यवस्था खरेदी केली आहे. निवडणूक आयोग खरेदी केला आहे. आमदार-खासदार खरेदीही केले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रचंड संघर्ष करावा लागणार आहे. असेही राऊत यांनी यावेळी सांगितले केली.
तर हल्लाबोल मोर्चा काढावा लागेल...
आक्रोश मोर्चानंतर परिस्थिती सुधारली नाही, तर महाविकास आघाडीला हल्लाबोल मोर्चा काढावा लागेल. कांदा आणि साखरेच्या दरवाढीने शेतकऱ्याला चार पैसे मिळतील, असे वाटले होते. मात्र, केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी आणि इथेनॉल उत्पादन बंदीचा निर्णय घेऊन सरकारने शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शेतकरी या सरकारला माफ करणार नाही, असा इशारा थोरात यांनी यावेळी दिला.
शिक्षा म्हणून निलंबित केले...
शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची शिक्षा म्हणून आम्हाला निलंबित करण्यात आले. मराठा, धनगर, मुस्लीम, लिंगायत या समाजांना आरक्षण मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीची वज्रमूठ कायम राहील असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. कोल्हे म्हणाले, ''महाराष्ट्रातील सध्याचे मुख्यमंत्री म्हणतात की हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. मात्र, कांद्याची निर्यात बंदी केल्यानंतर सरकारमधील एकानेही केंद्र सरकारच्या डोळ्याला डोळा भिडवून प्रश्न मांडले नाहीत. पालकमंत्री पद, मंत्रिमंडळ विस्तार यासाठी दिल्लीला धाव घेता येते. शेतकऱ्यांसाठी नाही. सत्तेत बसलेल्या नेत्यानी लाचारीची झूल पांघरली का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे''.
कृषीमंत्री नाही तर देश चालणार कसा ; शरद पवारांचा प्रश्न...
शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे दर प्रचंड घसरले आहेत. त्यामुळे सरकार समोर जगावं कसं हा प्रश्न मांडायचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला तर सरकार त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. देशाला कृषिमंत्री नाही, देश कसा चालणार, असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला. दहा दिवसांत २५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, अशी बातमी तेथील वृत्तपत्रांमध्ये होती. देशाची भूक भागविणारा शेतकरी आत्महत्या करतो, ही गोष्ट छोटी नाही. याकडे लक्ष वेधून पवार म्हणाले, कृषीमंत्री असताना शेतकरी आत्महत्याची घटना घडली होती. तेव्हा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना घेऊन लातूर, यवतमाळ आणि वर्धा येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर दिल्लीला गेल्यावर लगेच ७० हजार कोटींची शेतकरी कर्जमाफी जाहीर केली होती. परंतु या सरकारला शेतकऱ्यांकडे पाहण्यास वेळ नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.