नजर कधी इकडे तर कधी तिकडे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीनंतर भारतीय जनता पक्षातील गोटात नाराजीचे वातावरण कायम होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान, गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघरमधील कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मात्र, उभय नेत्यातील नाराजी आणि अबोला कायम असल्याचे दिसत होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 16 Jun 2023
  • 12:16 am
नजर कधी इकडे तर कधी तिकडे

नजर कधी इकडे तर कधी तिकडे

पालघरमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर, नजरानजर टाळली, कटूता कायम

#मुंबई 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीनंतर भारतीय जनता पक्षातील गोटात नाराजीचे वातावरण कायम होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान, गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघरमधील कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मात्र, उभय नेत्यातील नाराजी आणि अबोला कायम असल्याचे दिसत होते. 

वेगळ्या कारने प्रवास 

शिंदे आणि फडणवीस दोघेही एकाच हेलिकॉप्टरने पालघर येथील कार्यक्रमाला आले. कार्यक्रमात दोन्ही नेते एकमेकांशी बोलताना आढळले नाही. त्यामुळे जाहिरातीवरून निर्माण झालेली राजकीय कटूता अद्यापही कायम असल्याचे दिसत होते. पालघरमध्ये आल्यावर शिंदेंनी फडणवीसांकडे एकाच कारमधून कार्यक्रमस्थळी जाण्याचा आग्रह धरला. पण फडवीसांनी त्यांना हाताने 'तुम्ही चला' असा इशारा करत ते वेगळ्या कारने गेले. कार्यक्रमस्थळी दोन्ही नेते व्यासपीठावर एकमेकांच्या शेजारी बसले. त्यांच्यात मनमोकळी चर्चा होताना दिसत नव्हती. दोघेही कधी इकडे तर कधी तिकडे किंवा वर पाहत वेळ मारून नेताना दिसले. माध्यमांच्या कॅमेऱ्यात दिसणारी त्यांची देहबोली नाराज असल्याचे सांगत होती. त्यांच्यातील या विसंवादाची माध्यमांत चांगलीच चर्चा रंगली होती.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा लोकप्रिय उपमुख्यमंत्री असा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की,महाविकास आघाडी सरकारने फडणवीस यांच्या काळातील अनेक योजना बंद केल्या. देवेंद्रजी पाच वर्षे मुख्यमंत्री होते. आता आपल सरकार आल्यानंतर योजना पुन्हा सुरू केल्या. देवेंद्रजींच्या अनुभवाचा राज्याला फायदा झाला.  आमची युती सत्तेसाठी झाली नाही. एका वैचारिक भूमिकेतून ही युती झाली. मिठाचा खडा आम्ही बाजूला केला. फडणवीस आणि माझी दोस्ती १५ वर्षापासून आहे. जिवाभावाची आमची मैत्री आहे. हे बॉन्डिंग तुटणार नाही. फेविकॉल लावलेली आमची जोडी आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आताचे शासन बदलले आहे. सरकारी कार्यालयात आता खेटे मारायला लागत नाहीत. आपल्या योजना थेट लोकांपर्यंत पोहचल्या पाहीजेत, असा आमचा उपक्रम आहे. आमचे सरकार आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये फरक आहे. शासन आपल्या दारी उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.  डबल इंजिन सरकार येण्यापूर्वी सर्व कामांना ब्रेक लागले होते. आता सरकारने ४०० चांगले निर्णय घेतले आहेत.

सरकार तकलादू नाही- फडणवीस  

फडणवीस यांनी दोघांच्यात नाराजी नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी जनतेला संबोधित करताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ठाकरे सरकार घरी बसले होते. हे सरकार तुमच्या दारी आले, असा टोला त्यांनी लगावला. हे सरकार लाखो लोकांपर्यंत पोहोचले आहे. आमचा एकत्रित प्रवास हा २५ वर्षाचा आहे आणि आता हे नाते  घट्ट झाले आहे. आम्ही नेहमी एकत्र राहणार. जाहिरातीमुळे आमच्यात दुरावा येणार नाही. आमच्या एकत्र प्रवासाची चिंता नको. कोणत्याही जाहिरातींमुळे वाद होईल इतके तकालादू सरकारे नाही. आमचे सरकार मविआ पेक्षा घट्ट आहे. सरकार मजबूत आहे. 

बोंडे यांची उंची किती?- शिवतारे 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केलेल्या टीकेवर शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी सडकून टीका केली असून ते म्हणाले की, “अनिल बोंडे यांची उंची किती आहे. अनिल बोंडे माझ्याबरोबर मंत्री होते. त्यांची बुद्धी मला माहिती आहे. त्यामुळे बोडेंनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वक्तव्य केलं असेल, तर दुर्दैवी आहे. टीका कोणी करावी, यालाही महत्व असते. ताकदीच्या माणसाने टीका केली, तर उत्तर नक्की द्यायला हवे. फडणवीसांच्या जवळील व्यक्तीने दाखवण्यासाठी आणि स्वार्थासाठी अशी बेजबाबदार वक्तव्य करणे, चुकीचं आहे.

चर्चा मीडियामध्येच-अजित पवार 

राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की,  एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही माहितीये की एकमेकांसोबत राहिल्याशिवाय दोघांची पदं राहणार नाहीत. १५५ आमदार जोपर्यंत त्यांच्याबरोबर आहेत, तोपर्यंत त्यांचे सरकार चालणार आहे. त्यामुळे ते कशाला एकमेकांमध्ये अंतर पाडून सत्ता घालवतील? या सगळ्या चर्चा मीडियामध्येच आहेत.

चार खासदार असणारे पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहातात आणि आमच्यावर टीका करतात, असे म्हणणाऱ्या अमेय खोपकर यांच्याबाबत अजित पवार म्हणाले की, ज्यांना थोडंही डोकं चालवायचं नाही, असे लोक काहीही बोलतात. शरद पवारांनी आधीच सांगितलंय की मी पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नाही. इतके कमी खासदार घेऊन कुणीही पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत राहू शकत नाही. हे आम्ही मान्य केले आहे.

 शिवसेना खासदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे हे दिल्लीचा दौरा करून मुंबईत परतले आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कोणत्या कामासाठी दिल्ली दौरा केला याचे स्पष्ट उत्तर दिलेले नाही. माध्यमंशी बोलताना, त्यांनी या प्रश्नाला थेट उत्तर देणे टाळले. ते म्हणाले की, माझे काही वैयक्तिक कामे होती, जी करण्यासाठी मी दिल्लीला गेलो होतो. अशी कामे जी तुम्हाला सांगू शकत नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest