काॅग्रेसमधील लाथाळ्या चव्हाट्यावर
#मुंबई
काॅंग्रेससह महाविकास आघाडीतील नेत्यांनी जीभेवर संयम ठेवावा, असा सल्ला काॅंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिल्यानंतर ‘वडेट्टीवारांचा निर्णय बंद खोलीत करू,’ असे आक्रमक प्रत्युत्तर काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. महाविकास आघाडी आणि विशेषतः काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्या मंगळवारी (दि. ९) अशा रितीने चव्हाट्यावर आल्या.
राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद तसेच शरद पवार यांनी दिलेला राजीनामा आणि तो मागे घेतल्याचे प्रकरण गाजत असतानाच काॅंग्रेसमध्येही सर्व काही आलबेल नव्हते. नाना पटोले राष्ट्रवादीतील घडामोडींबाबत तसेच या पक्षाच्या नेत्यांबाबत टिप्पणी करीत होते. यावर राष्ट्रवादीकडून अनेकदा आक्षेपही घेण्यात आला. त्यावर काॅंग्रेसचे विदर्भातील नेते विजय वडेट्टीवार यांनी सामंजस्याची भूमिका घेत नाना पटोले यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. मात्र, पटोले यांनी उलट वडेट्टीवारांनाच सुनावले.
महाविकास आघाडीतील नेत्यांना आवाहन करताना विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘‘आपण सर्वांनी लिहिताना, बोलताना भान ठेवावे. भान ठेवून बोलावे. भान ठेवून लिहावे. तोडण्याची भाषा करू नये. जोडण्याची भाषा प्रत्येकाने करावी.’’ हे बोलताना वडेट्टीवारांचा रोख आपले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर होता. ‘‘येणारे सरकार महाविकास आघाडीचे असणार आहे. कितना भी जोर लगाले, ये टुटनेवाला नही है. थोडे ढिले झाले तरी पुन्हा फेव्हिकॉल लावत जाऊ. जोडत जाऊ. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कोणत्याही विरोधकांनी चिंता करण्याचे कारण नाही,’’ असेही वडेट्टीवार म्हणाले.
प्रसारमाध्यमांनी विजय वडेट्टीवारांच्या सल्ल्याबद्दल नाना पटोले यांना विचारले असता ते आक्रमक झाले. ‘‘वडेट्टीवारांचा निर्णय बंद खोलीत करू. ते एवढे मोठे नाहीत की, त्यासाठी मी इथे उत्तर दिले पाहिजे,’’ अशी आगपाखड पटोले यांनी केली.
पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीत मिठाचे खडे टाकू नयेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी लगावला. ते म्हणाले, ‘‘पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आघाडीची सत्ता का गेली? काँग्रेसचे सोनिया गांधी, राहुल गांधी, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार हे जोपर्यंत एकत्रित आहेत. तोपर्यंत कोणी काही बोलले, तर त्याकडे फार लक्ष द्यायचे कारण नाही. आपल्या नेत्यांनी ज्या प्रमाणे ठरवले आहे, त्याप्रमाणे खालच्या लोकांना काम करायचे आहे. त्याच्यामध्ये कोणी मिठाचे खडे टाकू नये.’’