गरोदर महिलांच्या पोषण आहारात अळ्या
शिरूर तालुक्यात पोषण आहारात अळ्या सापडल्याचा प्रकार उघडकीस आला असल्याची महिती समोर आली आहे. त्यानंतर शिरूर लोकसभेचे खासदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी एक व्हिडिओ शेअर करत दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच हे पोषण कुणाचं गरोदर महिलांचं आणि पोटातल्या बाळाचं आहे की ठराविक अधिकारी आणि ठेकेदारांचं असा सवाल त्यांनी केला. तसेच शासनाने आणि पालकमंत्र्यांनी तातडीने यावर कारवाई करावी अशी मागणी खासदार कोल्हे यांनी केली आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी लिहिलं आहे की, शिरूर तालुक्यातील आंबळे गावात शासनाच्या वतीने गरोदर महिलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात अळ्या सापडल्याचा प्रकार अतिशय धक्कादायक आणि संतापजनक आहे.बाजारातून मुदत संपत आलेला खराब माल कमी दरात घेऊन चढ्या दराने ठेकेदारांच्या माध्यमातून वितरित करायचा असा प्रकार सुरू आहे. माझ्या माता-भगिनींचा, त्यांच्या पोटातील बाळाचा जीव धोक्यात घालून नेमकं कोणाचं "पोषण" सुरू आहे याची चौकशी करून दोषी अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कडक कारवाई करावी.