''मला तुम्ही सालगडी केलंय का?'' असा संतप्त सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यकर्त्यांसह नागरिकांवर भर सभेत संतापले. 'तुम्ही मते दिली म्हणजे मालक नाही झालात', असं विधानही पवार यांनी यावेळी केलं. अजित पवारांचा हा रोख पाहता राजकीय वर्तुळात त्यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात आहे. तर दुसरीकडे मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांची पाठराखण केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार काल बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बारामतीमध्ये अनेक विकासकामांचे उद्घाटन केले. दरम्यान, बारामतीमधील मेडद येथील तालुका खरेदी विक्रि संघाच्या परिसरात पेट्रोल पंपाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते पार पडले यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पावर भलतेच भडकले.
नेमकं घडलं तरी काय?
पेट्रोल पंपाच्या उद्घाटनावेळी कार्यकर्ते आणि नागरिक कामांचे निवदेन देत होते. निवेदन स्विकारत पवार अधिकाऱ्यांना कामं मार्गी लावण्याच्या सूचना देत होते. दरम्यान, एका कार्यकर्त्यांने अनेक काम झाली नसल्याचे म्हटलं. त्यानंतर नागरिकांनीही री ओढली. यावेळी पवार संतापले, अरे तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलंय का? असा संतप्त सवाल उपस्थित केला.
पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. विरोधी पक्षाकडून टीका करण्यात येत आहे. अशातच मंत्री शिरसाट यांनी पवारांनी रागाच्या भरात वक्तव्य केलं असावे सांगत पवारांची पाठराखण केली.