Devendra Fadnavis
संतोष देशमुख हत्याप्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराड सध्या बीड पोलिस कोठडीत आहे. हत्याप्रकरणी देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीने राज्यभरात जोर धरला आहे. अशातच आरोपी असलेल्या कराड सोबत मंत्री धनंजय मुंडे यांचे संबंध आहेत. ते त्याला मदत करतात असा आरोप अनेक नेत्यांकडून होत आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे नाव आल्याने राज्यभरातून त्यांची मंत्रीपदावरुन हाकलपट्टी व्हावी अशी मागणी होत आहे. अशातच मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी 'मदत करणाऱ्यांना आम्ही सोडत नाही' असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मुंडेंच्या मंत्रीपदावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
आरोपी कुठेही गेले असतील तर त्यांच्यावर कारवाई सुरु आहे. निर्धाराने कारवाई सुरु आहे. या प्रकरणामध्ये काहीही झाल तरी कोणीही कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही. जे जे दोषी आहेत आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात, हफ्ते गोळा करतात त्या लोकांवर आम्ही जरब बसवण्याच प्रयत्न करणार आहे. योग्य कारवाई सुरु आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची काहीही तक्रार असली तर पोलिस त्यांच्यावर कारवाई करतील.
तसेच माध्यमांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सवाल उपस्थित केला असता, फडणवीस म्हणाले, मदत करणाऱ्यांनाही आम्ही सोडणार नाही. आम्ही कोणत्याही दोषीला सोडत नाही. या प्रकरणाचा वापर राजकारणासाठी करु नये, सरपंचाची हत्या झाली आहे. हत्येच राजकारण करु नये, समाजामध्ये काहीतरी सुधार व्हाही असा आमचा प्रयत्न आहे. असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
सध्या वाल्मिक कराड यांना चौकशीसाठी सीआयडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी देखील सुरु आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तीनही आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे. केज न्यायालयाचे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस व्ही पावसकर यांनी ही शिक्षा सुनावली आहे. या तीनही आरोपींना 25 दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे. फरार असलेला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेच्या मुसक्या एसआयटीच्या पथकाने बालेवाडीत आवळल्या. अद्याप या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र फरार आहे.