संग्रहित छायाचित्र
सध्याच्या शिक्षण पद्धतीवर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेलं वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आलं आहे. तसेच, सुळे यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्या शिक्षणपद्धतीचा आणि शाळेचा किस्सा शेअर केला.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित 15वी राज्यस्तरीय शिक्षण परिषदेच्या कार्यक्रमात सुळे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी, ' बाहेर जरी ते शरद पवार असले तरी घरात ते नवराच आहेत. आता याची हेडलाईन करू नका, नाहीतर घरी जाऊन मला जोडे बसतील.' असा मिश्किल शब्दात सुळेंनी वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं सभागृहात एकच हशा पिकला.
नेमकं काय म्हणाल्या सुळे?
मराठी भाषेवर आपण प्रेम केलं पाहिजे. पुढच्या पिढीला मराठी भाषा चांगली आली पाहिजे. आर. आर पाटील सोडले तर राजकारणात कोणत्याही नेत्याची मुलं सरकारी शाळेत गेलेले नाही, ते वास्तव आहे. अगदी मीही गेलीली नाही. पवार कुटुंबात कॉन्व्हेंट मध्ये जाणार पहिलं मूल म्हणजे मी आहे.
माझ्या वडिलांचं फार म्हणणं होतं की मी मराठी शाळेत शिकावं, परंतु आईच्या आग्रहामुळे मी कॉन्व्हेंटमध्ये शिकली. घरात बऱ्याच गोष्टींमध्ये आईचं चालतं, तो भाग वेगळा. बाहेर जरी ते शरद पवार असले तरी घरात ते नवराच आहेत. आता याची हेडलाईन करू नका, नाहीतर घरी जाऊन मला जोडे बसतील. असं मिश्किल वक्तव्य सुळेंनी यावेळी केलं.
तसेच, सध्याच्या शिक्षणपद्धतीवर बोलताना सुळे म्हणाल्या, तंत्रज्ञान येतं ते शिकावं या मताची मी आहे आणि मला पण ते आवडतं. परंतु पहिल्यांदा मला तंत्रज्ञानाची भीती वाटते. चॅट जीपीटीची भीती वाटतीय. जीपीटीच्या माध्यमातून पोर गृहपाठ करायला लागली तर मेंदूच आकलन कसं होईल? हा खूप गंभीर विषय बनला असल्यीच भीती वाटत असल्याची खंत सुळेंनी यावेळी व्यक्त केली.