जाहिरातीवरुन जुंपली, युतीत तणाव

‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ ही जाहिरात मंगळवारी (दि. १३) महाराष्ट्रातील प्रमुख्य वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर प्रसिद्ध झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट या राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये चांगलीच जुंपली आहे. या जाहिरातीत केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच फोटो आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 15 Jun 2023
  • 04:27 pm
जाहिरातीवरुन जुंपली, युतीत तणाव

जाहिरातीवरुन जुंपली, युतीत तणाव

#मुंबई

‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ ही जाहिरात मंगळवारी (दि. १३) महाराष्ट्रातील प्रमुख्य वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर प्रसिद्ध झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट या राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये चांगलीच जुंपली आहे. या जाहिरातीत केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच फोटो आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो यात नसून जाहिरातीतील मजकूर आणि त्याची मांडणी बघता फडणवीस यांचे महत्व नाकारण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसतो. यामुळे भाजपचे अनेक नेते शिंदे गटाच्या या कृतीवर सडकून टीका करीत आहेत. या एका कृतीमुळे युतीत तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, बच्चू कडूंसारखे सहकारी मुख्यमंत्री शिंदेच्या बचावत उतरले, तर विरोधकांनी ही संधी साधत राज्यातील भाजप नेत्यांचा फोटा जाहिरातीत नसल्यावरून टीका केली.

शिंदेच्या शिवसेनेकडून मंगळवारी देण्यात आलेल्या जाहिरातीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःचे वर्चस्व दाखविण्यासाठी या जाहीरातीत देवेंद्र फडणवीसांना स्थानच दिले नाही, अशी चर्चा आहे. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदेंना अधिक पसंती आहे, असा दावा या जाहीरातीत करण्यात आला होता. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. देवेंद्र फडणवीस यांनी तर कोल्हापूर येथील एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा संयुक्त दौराही रद्द केला. त्यामुळे फडणवीसांची नाराजी हा सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे.

बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही : अनिल बोंडें

बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही, अशा शब्दांत भाजप खासदार आणि राज्याचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बुधवारी (दि. १४)  टीका केली. यामुळे ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’या शिंदे गटाच्या जाहिरातीवरून भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेला तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अनिल बोंडे यांनी या सर्व प्रकारावरुन तिखट शब्दांत शिंदे गट आणि थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा आदरच आहे. मात्र, त्यांचे सल्लागार त्यांना चुकीचे सल्ले देत आहेत, असे वाटते. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना मुंबई म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्र वाटायचा. तसेच, एकनाथ शिंदेंना आता ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र वाटत आहे. मात्र, ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नाही. बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होत नाही. त्यामुळे एका जाहिरातीत दावा केला म्हणून आम्हाला काहीही फरक पडत नाही. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे सर्वोत्तम नेर्तृत्व आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अशा सर्व भागात देवेंद्र फडणवीसांनी प्रभावी काम केले आहे.’’

आणखी एक जाहिरात

‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीवरून निर्माण झालेला वाद मिटवण्याचा प्रयत्न म्हणून एक नवी जाहिरात वृत्तपत्रांमध्ये देण्यात आली. बुधवारी (दि. १४) छापून आलेल्या या जाहिरातीत शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरे, दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदे गटातील ९ मंत्र्यांचे फोटो छापले आहेत. ही नवीन जाहिरात म्हणजे सोबत असलेले आमदार फुटू नये म्हणून शिंदे गटाकडून सुरू असलेला आटापिटा असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांवर अशी टीका योग्य नाही : शंभुराज देसाई

भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या या तिखट प्रतिक्रियेवर शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी मात्र संयत प्रतिक्रिया दिली आहे. देसाई म्हणाले, ‘‘वृत्तपत्रांमध्ये छापून आलेली ही जाहिरात शिवसेनेची अधिकृत जाहिरात नव्हती. शिवसेनेने ही जाहिरात दिलेली नाही. शिवसेनेच्या एका हितचिंतकाने ती जाहिरात दिली आहे. या जाहिरातीमुळे दोन्ही पक्षात काही संभ्रम निर्माण झाला असेल तर दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते चर्चेतून तो दूर करतील. खासदार अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया मी ऐकली आहे. मुख्यमंत्र्यांवर अशा शब्दांत टीका करणे योग्य नाही. आम्ही संयम पाळला आहे. त्यांच्याकडूनदेखील संयम पाळण्याची अपेक्षा आहे.

शिंदे गटाने फडणवीसांचे मातेरे केले : संजय राऊत

तब्बल १०५ आमदारांचे नेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे शिंदे गटाच्या ४० जणांनी मातेरे केले आहे. त्यामुळे त्यांचे कानदुखीचे कारण खरे असू शकेल. या जाहिरातीमुळे फडणवीसांचे कानच काय, पोट, छातीतही दुखू शकते, असा खोचक टोला ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी बुधवारी (दि. १४) लगावला. 'देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे', या शिंदे गटाच्या जाहिरातीमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमालीचे नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच कानदुखीचे कारण देत त्यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोल्हापूरला जाणे टाळले, अशीही चर्चा आहे.  यावर संजय राऊत म्हणाले, जाहिरात आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा कान दुखत आहे. त्यांना कानदुखीचे कारण खरे आहे. जे वारं सध्या महाराष्ट्रात चालू आहे, ते वारं जर कोणाच्या कानात शिरले, तर कोणाचाही कान दुखू शकतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची प्रकृती समजून घेतली पाहिजे. या वातावरणात शिंदे सरकारला हार्ट अटॅकही येऊ शकतो.’’

शिंदेंनी उठाव केला नसता तर सत्ता आलीच नसती : बच्चू कडू

एकनाथ शिंदे यांनी जर उठाव केला नसता तर भाजप सत्तेत आलेच नसते. त्यामुळे भाजपने शिंदेंचे महत्त्व जाणावे, असा खोचक सल्ला देत आमदार बच्चू कडू यांनी शिंदे गटाच्या बाजूने बॅटिंग करीत भाजपला खडेबोल सुनावले. बच्चू कडू म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह उठाव केला. त्यांच्यामुळे भाजप सत्तेत आले आहे. नाही तर पुढील पाच वर्षे उद्धव ठाकरे यांचे सरकार राहिले असते तर भाजपच्या १०५ आमदारांची संख्या पुढील निवडणुकीत ५० ते ६० वर आली असती. याची जाणीव ठेवून  शिंदेंसह त्यांच्या सहकाऱ्यांचे महत्त्व भाजपने लक्षात घ्यावे. एकनाथ शिंदे असे एकमेव मुख्यमंत्री आहेत, ज्यांच्या बंगल्यावर रात्री बारा ते एक वाजेपर्यंत लोक मदतीसाठी येतात. मुख्यमंत्रीदेखील त्यांना हवी ती मदत करतात.’’

भाजपच्या मंत्र्यांचा फोटो का नाही : अजित पवार

शिंदे सेनेच्या जाहिरातीवरून भाजप आशि शिंदे गटात जुंपली असतानाच राज्यातील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. ‘‘प्रचंड खर्चाच्या या जाहिराती देणारा शिवसेनेचा हितचिंतक कोण आहे? यावर भाजपच्या मंत्र्यांचा फोटा का नाही?’’ असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.  

इतक्या प्रचंड खर्चाच्या जाहिराती देणारा असा कोण हितचिंतक शिवसेनेला मिळाला त्याचे नाव तरी त्यांनी सांगावे. ज्यांच्या पाठिंब्यावर हे स्वत: मुख्यमंत्री आणि काही मंत्री झाले, त्याच पक्षाला हा खोडसाळपणा वाटतोय, असा टोला पवारांनी लगावला आहे. ‘‘जाहिरातीबाबत आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यायला पाहिजे होती. नवी जाहिरात म्हणजे आधीच्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये तुम्ही भाजप आणि शिवसेनेचा जाहिरातीत उल्लेख केला आहे तर मग फक्त शिवसेनेच्या ९ मंत्र्यांची खाली माळ लावली आहे. भाजपच्या मंत्र्यांचे फोटो का टाकले नाहीत,’’ अशी विचारणा करीत अजित पवार यांनी शिंदे गटाला कोंडित पकडण्याचा  प्रयत्न केला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest