जितेंद्र आव्हाड, चित्रा वाघ यांची एकमेकांवर पातळी सोडून टीका
#मुंबई
सध्या राज्यातील राजकारण्यांची टीका करण्याची पातळी घसरली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचाच प्रत्यय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यात सुरू असलेल्या वाक् युद्धावरून दिसून आला. दोघांनीही एकमेकांवर मर्यादा ओलांडून खालच्या पातळीवरील टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेताना आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यावर भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी टीका केली होती. अशा व्यक्तींना वेळीच आवर घाला, असे त्या म्हणाल्या होत्या. यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड यांनी आपली पातळी सोडली. त्यांनी 'हमाम में सब नंगे है' आणि 'अँटी चेंबरमधील विनोद' असा उल्लेख करीत ‘‘मला त्यांनी बोलावं ज्यांचे हात स्वच्छ आहेत. अजून खूप बोलू शकतो. बहिणीला सांभाळून घेत आलो, पण...’’ अशी आक्षेपार्ह वैयक्तिक टीका आव्हाड यांनी चित्रा वाघ यांच्यावर केली. चित्रा वाघ यांनीदेखील त्याला हीन पातळीवरून उत्तर दिले. त्या म्हणाल्या, ‘‘उत्तर नसतं तेव्हा स्त्रीची बदनामी हे तुमचं शस्त्र असतं. आव्हाड नाहीसच तू, हाड हाड आहेस आणि तीच तुझी लायकी आहे. राजकीय मुद्द्यांवर बोलता येत नसेल तर तुझं थोबाड बंद ठेव. माझ्या नादी लागू नकोस, हे लक्षात ठेव.’’