जयंत पाटील पुन्हा टार्गेट?
#सांगली
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संबंधित असलेल्या इस्लामपूरमधील राजारामबापू बँकेतून सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) पथक अखेर ५३ तासांनंतर बाहेर पडले आहे. एका महिन्यापूर्वी ईडीने ९ तास जयंत पाटील यांची चौकशी केल्यानंतर आता राजारामबापू बँकेची सलग दोन दिवसांपेक्षा जास्त काळ चौकशी केल्याने ईडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा जयंत पाटील यांना टार्गेट करण्यात आल्याची चर्चा आहे.
सांगलीतील पारेख बंधू आणि येथील काही व्यापाऱ्यांवर ईडीने धाड टाकली होती. या व्यापाऱ्यांच्या बँक खात्यांची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. ही बँक जयंत पाटील यांच्याशी संबंधित असल्याने यावर चांगली राजकीय चर्चा रंगली आहे. त्यानंतर ईडीच्या पथकाने तब्बल ५३ तासांच्या चौकशीनंतर इस्लामपूरमधील राजारामबापू बँकेचा ताबा सोडला. या कालावधीत ईडीचे अधिकारी आणि बँक कर्मचारी बँकेतच थांबून होते. अखेर रविवारी (दि. २५) पहाटे पाच वाजता अधिकारी आणि कर्मचारी बॅंकेतून बाहेर पडले.
सांगली आणि परिसरातील १५ व्यापाऱ्यांच्या बँक खात्यांच्या प्रकरणी ही चौकशी करण्यात आली आहे. पारेख बंधू आणि छापा टाकण्यात आलेल्या व्यापाऱ्यांच्या बँकेच्या खात्यात मनी लाँडरिंगचा आरोप करण्यात आला होता. जयंत पाटील यांच्याशी संबंधित असलेल्या राजारामबापू सहकारी बँकेच्या कार्यालयासह पश्चिम महाराष्ट्रात १४ ठिकाणी ईडीने छापे टाकले होते. दहा वर्षांपूर्वीच्या एक हजार कोटी रुपयांच्या संशयित व्यवहारांचा ईडी तपास करत आहे. या प्रकरणी बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाते उघडून मोठी रक्कम रोकड स्वरूपात वळती केल्याचा आरोप करण्यात आला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर या आधीदेखील कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक अद्यापही तुरुंगात आहेत. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख हे काही काळापूर्वी बाहेर आले आहेत. त्यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची ईडीच्या वतीने चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे, याच कालावधीत भाजपच्या अनेक नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची तक्रार ईडीकडे करूनदेखील त्यांच्यापैकी एकाचीही चौकशी सुरू झालेली नाही. त्यामुळे ईडी केवळ भाजपच्या इशाऱ्यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांचा छळ करीत असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येत आहे.
वृत्तसंस्था