संग्रहित छायाचित्र
मुंबई: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणजे तमाशातील सोंगाड्या. त्याच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री जीआर काढतात. आजी, माजी मुख्यमंत्री जरांगेकडे जातात, पण ओबीसी समाजाची भूमिका कोणीही लक्षात घेत नाही. ओबीसी समाजाला कोणीही विचारत नाही. पृथ्वीराज चव्हाण हा दरबारी राजकारण करणारा नेताही जरांगेकडे जातो, पण ओबीसीकडे येत नाही. जरांगे पाटील हा 'बिग बॉस' (Bigg Boss) मध्ये शोभणारा माणूस आहे. यापेक्षा त्याची जास्त लायकी नाही, अशा शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधला आहे.
ओबीसी (OBC ) नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. जालन्यातील अंबड तालुक्यातील वडिगोद्रीत आजपासून लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू होणार आहे. याआधी लक्ष्मण हाके उपोषणस्थळी लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हाके यांनी जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगे प्रत्येक आंदोलनात वेगळी मागणी करत सुटले आहेत. ना कसला आगापिछा ना कसला अभ्यास. त्यांच्या बॅनरवर फुले-शाहू-आंबेडकरांचा फोटो असतो का, तरीही सगळ्यांना जरांगेची काळजी आहे. या माणसाच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री जीआर काढतात, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यालाही कायदा कळत नाही, हे उघड होते. हैद्राबाद गॅजेट १९१ चा असेल आणि शासन तो ग्राह्य धरून मान्य करत असेल तर मागासवर्ग आयोग कशाला केला. राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीशिवाय जीआर काढता येत नाही. जरांगेच्या सांगण्यावरून शिंदे यांचे सरकार जीआर काढत असाल तर अवघड आहे.
त्यांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा
जरांगे यांनी मुख्यमंत्री व्हावे, त्यासाठी आमच्या शुभेच्छा. पण जरांगे मुख्यमंत्री झाला किंवा त्याचे बोलवते धनी शरद पवार जरी मुख्यमंत्री झाले तरी ओबीसीतून मराठा आरक्षण देता येणार नाही. मनोज जरांगे याने आपल्या बॅनरवर तुतारीचे चिन्ह लावावे. ते आम्हाला म्हणतात आम्ही भुजबळ, फडणवीस यांचे समर्थक आहोत. तुम्ही कोणाचे समर्थक आहात हेही एकदा जनतेला कळू द्यात. जर हैद्राबाद गॅझेट लागू केले तर आम्ही न्यायमूर्ती रोहिणी आयोगाचा अहवाल आम्ही न्यायालयाला पाठवू. जर तरीही सरकारने भूमिका घेतली नाही तर आम्ही मुंबईला जाऊ. आम्ही ओबीसी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करतोय त्यात गैर काही नाही. आम्ही एका बॅनरखाली बसलोय आमच्यात मतभेद नाही, असेही हाके यांनी म्हटले आहे.