जरांगेंची २४ पासून 'रास्ता रोको'ची घोषणा
अंतरवाली सराटी
सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २४ तारखेपासून राज्यभर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, उद्यापासून (गुरुवार) मराठा बांधवांनी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना मराठा आरक्षणासाठी निवेदन द्यावं. २४ तारखेपासून राज्यभर रोज सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करायचं. ज्यांना शक्य नसेल त्यांनी दुपारी ४ ते ७ रास्तो रोको करायचा. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने काल (मंगळवारी २० फेब्रुवारी) विशेष अधिवेशन बोलावलं. अधिवेशनात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, दुसरीकडे सरकारने आमची फसवणूक केली असून आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवंय, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.
सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी होत नसल्याने संतापलेले जरांगे पाटील म्हणाले की, मंगळवारचे आरक्षण आपल्या आंदोलनामुळेच मिळालेलं आहे. ते आरक्षण आम्हाला नकोच आहे. देशातली ही पहिली घटना आहे ज्यात गरीबांनी श्रीमंतांना आरक्षण दिले आहे. ज्यांना स्वतंत्र आरक्षण पाहिजे होते, त्यांना मिळालं आहे. तेही आरक्षण रद्द झालं तर मराठ्यांच्या तरुणांचं सात वर्षांचं नुकसान होईल.
भुजबळ यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल
साल्हेर किल्ल्याजवळ ताफ्यात ब्रेक फेल झालेले पिकअपसारखे वाहन घालून घातपात करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करून जरांगे पाटील म्हणाले की, या घातपातासाठी कार्यकर्ता कोणी पाठवला होता ते मला माहिती आहे, गृहमंत्र्यांनी याची सखोल चौकशी करावी, नाहीतर मला नाव जाहीर सांगण्याची वेळ येईल. साल्हेरला कोण आलं होतं, घातपातासाठी कोणता कार्यकर्ता पाठवला होता, मला चांगलंच माहिती आहे, ते वाहन कसं घुसलं ते माहिती आहे. नाव न घेता त्यांनी यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे
जरांगे-पाटील म्हणाले की, जे आम्हाला नको आहे, ते आरक्षण सरकार आम्हाला देत आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण हवं आहे. सरकारला सरसकट आरक्षण देण्यात काय अडचण आहे? त्यांनी सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यावे. सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी झाली पाहिजे.
बारसकर यांचे आरोप
मनोज जरांगे यांच्यावर आंदोलनातील अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. बारसकर म्हणाले, जरांगे पाटील हेकेखोर आहेत. त्यांनी मराठ्यांना उद्ध्वस्त केले आहे. जरांगे लोकांची फसवणूक करत आहेत. जरांगे यांना बोलताना भान राहत नाही. मनोज जरांगे यांनी बंद खोलीत बैठका केल्या. जरांगे यांच्या बैठका रात्री होतात. त्यांनी लोकांची फसवणूक केली आहे.
मनोज जरांगे यांच्या मागण्या
कुणबी नोंदी शोधून त्यांच्या परिवारांना प्रमाणपत्र द्यावं
सगेसोयऱ्यांच्या बाबतीत दोन दिवसात निर्णय घ्यावा
हैदराबाद गॅझेट लागू करुन कुणबी-मराठा एकच असल्यचा निर्णय घ्या
एका ओळीचा आदेश काढून मराठ्यांचा ओबीसीत समावेश करा
अंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे सरसकट मागे घ्या
माजी न्यायमूर्ती संदीप शिंदेंच्या समितीला मुदतवाढ द्या