जे. जे. रुग्णालयातील ९ वरिष्ठ डॉक्टरांचा राजीनामा
#मुंबई
मुंबईतील जे. जे. रुग्णालयाच्या नेत्रोपचार विभागातील ९ वरिष्ठ डॉक्टरांनी सामूहिक राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली. पूर्वीच मार्डचे ७५० निवासी डाॅक्टर संपावर गेल्यामुळे रुग्णांचे हाल सुरू आहेत.
नेत्रोपचार विभागातील ९ वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेला सामूहिक राजीनामा, रुग्णालयातील मार्डच्या निवासी डॉक्टरांनी पुकारलेला बेमुदत संप, जे. जे. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या अंतर्गत वादामुळे रुग्णालयातील रुग्णसेवेवर, राज्याच्या आरोग्यसेवेवर होत असलेला दुष्परिणाम, या संदर्भात राज्याचे हित लक्षात घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी तत्काळ सर्वमान्य तोडगा काढावा आणि रुग्णांचे हाल थांबवावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री यांना पत्र लिहिले असून मुंबईतील जे. जे. रुग्णालयात सुरू असलेल्या वरिष्ठ डॉक्टरांच्या अंतर्गत वादामुळे रुग्णसेवा ठप्प पडली असून, त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांच्या सुरू असलेल्या फरफटीकडे लक्ष वेधले आहे.
अजित पवार आपल्या पत्रात म्हणतात, ‘‘मुंबईतील जे. जे. रुग्णालयातल्या नेत्रोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख, जे. जे. रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. शशी कपूर, डॉ. दीपक भट, डॉ. सायली लहाने, डॉ. प्रीतम सामंत, डॉ. स्वरांजित सिंग भट्टी, डॉ. आश्विन बाफना, डॉ. हेमालिनी मेहता या नऊ वरिष्ठ डॉक्टरांनी आपल्या सेवेचा अचानक सामूहिक राजीनामा दिला आहे. नेत्र विभागाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी मोठ्या संख्येने सामूहिक राजीनामा दिल्याने, रुग्णांना तपासण्याचे आणि निवासी डॉक्टरांना शिकवण्याचे काम ठप्प पडले आहे.’’ यावर समाधानकारक तोडगा काढून रुग्णांचे हाल थांबवले पाहिजेत. जे. जे. हॉस्पिटलसारख्या संस्थेत शिस्त पाळली गेली पाहिजे, हे सुनिश्चित करण्याची वेळ आली आहे. मार्डच्या निवासी डॉक्टरांचंही समाधान होईल, असा सर्वमान्य, रुग्णांच्या, राज्याच्या हिताचा तोडगा काढण्यात यावा, अशी मागणीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या पत्रात केली आहे.
वृत्तसंस्था