माझा अतिक अहमद होऊ शकतो...
#मुंबई
अतिक अहमदप्रमाणे माझ्यावर जीवघेणा हल्ला होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करीत नार्कोटिक कन्ट्रोल ब्यूरोचे (एनसीबी) माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी आपल्या सुरक्षेची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडे सातत्याने चर्चेत आहेत. त्यांची सध्या बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सीबीआय चौकशी सुरू आहे. हे सुरू असतानाच वानखडे यांनी ‘‘मीडियाच्या रूपाने माझ्यावर जीवघेणा हल्ला होऊ शकतो,’’ असा दावा करीत मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे सुरक्षेची मागणी करणार
असल्याचेही सांगितले.
सीबीआयने शनिवारी (दि. २०) वानखेडे यांची सुमारे पाच तास चौकशी केली. त्यानंतर रविवारीदेखील (दि. २१) त्यांची कसून चौकशी झाली. सीबीआयने दोन दिवस उलटतपासणी घेतल्यानंतर वानखेडे यांच्या याचिकेवर सोमवारी (दि. २२) न्यायालयात सुनावणी झाली. यात वानखेडेंना ८ जूनपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे.
‘‘जे काही कायदेशीर आहे, ते मी न्यायालयात सांगणार आहे. सीबीआयला त्यांची बाजू मांडू द्या. माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. पण माझ्यावर मीडियाच्या माध्यमातून अतिक अहमदसारखा जीवघेणा हल्ला होऊ शकतो. कारण मला रोज सोशल मीडियावर धमक्या मिळत आहे. या संदर्भात मला पोलिसांनी सरंक्षण द्यावे, यासाठी पोलीस आयुक्तांकडे मी मागणी करणार आहे,’’ असे वानखडे यांनी सांगितले.
ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला न अडकवण्याच्या बदल्यात समीर वानखेडे यांनी अभिनेता शाहरुख खानला २५ कोटींची रक्कम मागितल्याचा मुख्य आरोप आहे. काही दिवसांपूर्वी वानखेडे यांचे विदेश दौरे, राहणीमान, भेटवस्तू, मालमत्ता यांच्याबाबत चौकशीतून अनेक आक्षेपार्ह गोष्टी समोर आल्या. या संदर्भात त्यांची सीबीआय चौकशी सुरू आहे. ‘‘सीबीआयच्या तपासात मी सहकार्य करत आहे. माझा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे. मला न्याय मिळेल,’’ अशी खात्री असल्याचे वानखेडे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, वानखेडे हे तपासात सहकार्य करीत नसल्याचा दावा सीबीआयकडून करण्यात आला होता.
वानखेडे यांनी २०१७ ते २०२१ या पाच वर्षांच्या काळात कुटुंबासह सहा परदेश वाऱ्या केल्या. युके, पोर्तुगाल, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका अशा ट्रीपचा समावेश असणाऱ्या दौऱ्यांचा कालावधी एकत्र केल्यास तो ५५ दिवसांहून अधिक होतो. यासाठी वानखेडे यांनी केवळ ८.७५ लाखांचा खर्च दाखवला आहे. जो वास्तविक खर्चापेक्षा खूपच कमी आहे. लंडनच्या १९ दिवसांच्या सहलीसाठी वानखेडे यांनी एक लाखांचाच खर्च दाखवला होता. तिथे ते एका नातेवाईकांकडे राहिल्याचे दाखविले होते. वानखेडे यांनी १७ लाख ४० हजारांचे रोलेक्स गोल्ड घड्याळ खरेदी केले होते. परंतु या घड्याळ्याची मूळ किंमत २२ लाख ५ हजार एवढी आहे. एवढेच नाही तर, वानखेडे यांचे मुंबईत चार फ्लॅट असल्याचा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.
चॅटमध्ये आर्यन खान संदर्भात केलेल्या संभाषणाचे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. त्यात काही धक्कादायक खुलासेही समोर आले आहेत. मुलाला सोडवा म्हणून शाहरुख विनवणी करीत होता. तसेच समीर वानखेडे आणि शाहरुखचे अनेक वेळा संभाषण झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, शाहरुखच्या चॅटमध्ये कोणतेही आमिषे नव्हते. चॅटमध्ये पैशांचा उल्लेख नव्हता.
वानखेडे सरसंघचालकांना भेटल्यानंतरच सीबीआय चौकशीचा ससेमिरा : नाना पटोले
भाजप आणि संघाची पोलखोल करू शकतात, असे काही तरी नक्कीच समीर वानखेडे यांच्याकडे आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, ‘‘वादग्रस्त माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. त्यानंतरच वानखेडे यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला. यामागे नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे. या भेटीनंतरच वानखेडे यांची सीबीआयने चौकशी सुरू केली. मी भाजप आणि संघावर आरोप करत नाहीये. मात्र, या कारवाईवर प्रश्न तर नक्कीच निर्माण झाला आहे. भाजप आणि संघाची पोलखोल करू शकतात, असे काही तरी नक्कीच समीर वानखेडे यांच्याकडे असावे.’’
वानखेडेंविरोधात सीबीआयला काय आढळले?
सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरनुसार, समीर वानखेडे यांच्या सांगण्यावरून केपी गोसावी नावाच्या व्यक्तीने आर्यनला सोडण्यासाठी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांच्याकडे २५ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्याऐवजी आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अडकवले जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. केपी गोसावी हा तोच व्यक्ती आहे ज्याने एनसीबीच्या ताब्यात असलेल्या आर्यनसोबत सेल्फी काढला होता. गोसावीला आर्यनसोबत सेल्फी घेण्याचे आणि त्याचा आवाज रेकॉर्ड करण्याचे स्वातंत्र्य होते, असा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.
वृत्तसंस्था