‘मनसे’चा पाठिंबा फायद्याचा की तोट्याचा?

भाजपाला अनुकूल असणारे परप्रांतीय बिथरण्याची शक्यता, काँग्रेसकडे झुकण्याची चिन्हे

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Thu, 11 Apr 2024
  • 02:33 pm
MNS BJP

‘मनसे’चा पाठिंबा फायद्याचा की तोट्याचा?

अपेक्षेप्रमाणे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) भारतीय जनता पक्षाचे (BJP) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याची घोषणा गुढी पाडव्याच्या सभेत मंगळवारी मुंबईत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांच्या खंबीर नेतृत्वाच्या मुद्द्यावर मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असला तरी याचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला फायदा किती आणि शिवसेना ठाकरे गटाचे किती, याचे अंदाज बांधले जात आहेत.  विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी यापूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. तसेच भाजपचे विविध नेते गेल्या काही महिन्यांत त्यांच्याशी सत संपर्क ठेवून चर्चा करत होते. त्याचा परिणाम म्हणून राज ठाकरे यांनी मोदी यांना पाठिंबा दिला आहे.मात्र,  परप्रातिंयांविषयी राज ठाकरेंची विरोधी भूमिका असल्लेल्ल्यायांना भाजपकडे आकृष्ठ होणारी परप्रांतियाची मते बिथरु शकतात.कदाचित ही मते काँग्रेसच्या पारड्यात पडू शकतात. 

कधी काळी तरुणांच्या पाठिंब्यावर राज्यात हवा निर्माण करणाऱ्या मनसेची हवा आणि लोकप्रियता गेल्या काही वर्षांत कमालीची ढासळली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला २.२५ टक्के मते मिळाली होती. मोदींना पाठिंबा दिला त्यानंतर यातील किती मते भाजपकडे प्रामुख्याने महायुतीकडे हस्तांतरित होतात यावर सर्व अवलंबून आहे. मनसेने महायुतीमध्ये यावे म्हणून गेले अनेक दिवस भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न सुरू होते. मुंबई, ठाण्यात शिवसेनेतच्या ठाकरे गटाला शह देण्याकरिता मनसेचा वापर करून घेण्याची भाजप, शिंदे गटाची योजना त्यामागे होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटाची ताकद शिल्लक राहिली नाही, असे भाजप, शिंदे कितीही दावे करीत असले तरी अजूनही या पक्षांना ठाकरे यांच्या पक्षाची भीती वाटते. ठाकरे गटाचे आमदार किंवा माजी नगरसेवक शिंदे गटाने फोडले असले तरी शिवसेनेचा पारंपरिक मतदारवर्ग अजूनही पूर्णपणे शिंदे यांच्याकडे हस्तांतरित झालेला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांना राज्याच्या कानाकोपऱ्यात मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता ठाकरे गटाची ताकद अद्यापही कायम दिसते. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या मतांमध्ये विभाजन करण्याकरिता महायुतीचे नेते राज ठाकरे यांचा पाठिंबा मिळविण्यात यशस्वी झाले आहेत.

मुंबईतील चार जागांवर शिवसेना ठाकरे गट रिंगणात आहे. या मतदारसंघाशिवाय ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण, भिवंडी, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, मावळ आदी मतदारसंघांमध्ये मनसेच्या पाठिंब्याचा फायदा होईल, असे महायुतीचे गणित दिसते. मुख्यत्वे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या विरोधात राज ठाकरे यांचा वापर करून घेण्याची भाजपचे धोरण दिसते. मनसेचा उमेदवार रिंगणात नसल्यास मनसेची पारंपरिक मते ही शिवसेना किंवा ठाकरे गटाकडे हस्तांतरित होतात हे यापूर्वीच्या निवडणुकीत अनुभवास आले आहे. २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीत राज ठाकरे यांनी उमेदवार उभे केले नव्हते. तेव्हा मनसेची भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीला अनुकूल होती. राज ठाकरे तेव्हा मोदी, भाजप आणि शिवसेनेवर टीका करीत होते. पण मनसेची पारंपरिक मते ही शिवसेनेच्या उमेदवारांच्या पारड्यात पडली होती. राज ठाकरे यांचा आम्हाला काहीच फायदा झाला नव्हता, अशी टिप्पणी तेव्हा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली होती.

सातत्याचा अभाव 

निवडणुकीतील पाठिंबा, टोल, फेरीवाले, प्रार्थनास्थळांवरील ध्वनिक्षेपक आदी महत्त्वाच्या विषयांवर राज ठाकरे यांनी आपल्या भूमिकेत कधीच सातत्य राखलेले नाही. मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाचा मुद्दा पुढे करीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असला तरी जनाधार आटलेल्या मनसेचा मोदींचा आधार घेण्याचाच प्रयत्न दिसतो, असे काही निरीक्षक मत व्यक्त करतात. 

उद्धव ठाकरे यांना विरोध हा एक कलमी कार्यक्रम मनसेने आतापर्यंत राबविला आहे. २००९ मध्ये विधानसबेतत १३ आमदार निवडून आले होते किंवा २०१२ मध्ये नाशिक महापालिकेची सत्ता मिळाली. मात्र, हे यशही टिकविता आले नाही. ठाकरे हे भूमिका बदलत गेल्याने मतदारांनीही त्यांना नाकारले. २०१९ मध्ये मोदींना टोकाचा विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांनी २००२४ च्या निवडणुकीत त्यांच्या खंबीर नेतृत्वाची प्रशंसा केली. राजकारणात राजकीय पक्षांच्या भूमिका बदलणे यात नवीन काहीच नाही. सोयीनुसार राजकीय नेते निर्णय बदलतात. पण राजकीय ताकद उभी केल्यावर तिचा निवडणुकीत फायदा करून घेत नसल्याने पक्षाला ओहोटी लागली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याचे टाळले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत होईल अशीच त्यांची भूमिका होती. त्यातून पक्षाचे सामान्य कार्यकर्ते शिवसेनेकडे आकृष्ट झाले. पुन्हा लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर करून ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना महायुतीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. मनसेचे पारंपरिक मतदार भाजपला कितपत मतदान करतील याबाबत साशंकता आहे. याउलट अशा लढतींमध्ये मनसेच्या पारंपरिक मतदारांना शिवसेना ठाकरे गट अधिक जवळचा ठरू शकतो. कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेची बहुतांशी मते ही शिवसेनेकडे हस्तांतरित झाली होती.

सरचिटणीसांचा राजीनामा

मनसेने लोकसभा निवडणूक लढविण्याऐवजी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याने मनसेमध्ये प्रतिक्रिया उमटू लागली आहे. राज ठाकरे यांची भूमिका न पटल्याने पक्षाचे सरचिटणीस कीर्तीकुमाक शिंदे यांनी पदाचा, पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. मोदी यांची बाजू घेणे हे राज ठाकरे यांना स्वत:साठी गरजेचे असू शकते पण त्यातून महाराष्ट्र किंवा मराठी माणसाचे काहीही भले होणार नाही, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest