इर्शाळवाडी दरड दुर्घटना : मृतांची संख्या १२ वर, बचावकार्य अद्यापही सुरूच
रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. इर्शाळवाडी येथील मृतांची संख्या १२ वर पोहचली आहे. तर यामध्ये १०३ जणांना बचावण्यात यश आले आहे. अद्यापही बचावकार्य सुरू आहे. आताही १०० जण मातीखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.
मुसळधार पावसामुळे इर्शाळगडावरील दरड इर्शाळवाडीवर कोसळली. दरडप्रवण क्षेत्राच्या बाहेर असलेल्या या भागात दरड कोसळल्याने गावातील लोक भयभीत झाले आहेत. दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडी येथे जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे तिथून गाडी जाणे अशक्य आहे. ही घटना समोर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्काळ खालापूरला दाखल झाले. तेव्हापासून ते परिस्थितीचा आढावा घेत होते. अशा परिस्थितीत घटनास्थळी जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायी चालत निघाले. दीड तास पायी चालत जाऊन ते इर्शाळगडावर पोहोचले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, “इथे वाहन येऊ शकत नाहीय. सर्व मॅन्युअली करावे लागत आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ, सामाजिक संस्थांकडून मदत केली जातेय. त्यांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. काही लोक कामानिमित्त बाहेर गेले आहेत, त्यांचा शोध घेतला जात आहे. काही मुले आश्रमशाळेत आहेत, त्यांची माहिती घेतली जाते आहे.”