File Photo
मुंबई : मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद जगजाहीर आहे. यावर भुजबळ यांनी मला पाडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा माझ्याविरोधातच निवडणूक लढवावी, असे आव्हान जरांगे पाटील यांना दिले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ते म्हणाले, जरांगे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी २८८ मतदारसंघात उमेदवार उभे करून दाखवावेत, तसेच माझ्या विरोधात येवल्यातून निवडणूक लढवावी.
मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेला सत्ताधाऱ्यांचे ११३ आमदार पाडू, असे आव्हान दिले होते. यावर भुजबळ यांनी वरील उत्तर दिले. ते म्हणाले, रोज रोज भूमिका बदलण्यापेक्षा मनोज जरांगेंनी २८८ उमेदवार उभे करून दाखवावेत. प्रत्येक वेळी भूमिका बदलण्याचे कारण काय? कधी ते उपोषणाला बसतात, दुसऱ्या दिवशी उठतात. आता म्हणतात मुस्लीम समाजाला आरक्षण मिळवून देऊ. मुस्लिमांना २५ वर्षांपूर्वीच आम्ही आरक्षण दिलेले आहे. याची माहिती नसल्यामुळे जरांगे पाटील अर्धवट ज्ञानाच्या आधारे बोलतात. आता ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पुढे येणार आहेत. माझे त्यांना आवाहन आहे की, त्यांनी एकच काहीतरी करावे.
जरांगे यांनी भुजबळ यांना निवडणुकीत पाडू, असे विधान केले होते. याबद्दल ते म्हणाले की, मला पाडण्यापेक्षा जरागेंनी माझ्याच विरोधात निवडणूक लढवावी. मला निवडणुकीत पाडले तरी माझा आवाज बंद होणार नाही. मला गेल्या पाच दशकांपासून संघर्ष करायची सवयच आहे. रस्त्यावर लढण्याची आणि सरकारमध्ये राहून काम करण्याची माझी तयारी आहे. येवला मतदारसंघात कुणीही येवो, पण मी लाखभर मतांनी निवडून येणार. जरांगे पाटील यांनी काहीतरी एकच भूमिका घ्यावी आणि मग बोलावे.