संग्रहित छायाचित्र
पुणे : सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (Savitribai Phule Pune University) घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवारी (७ एप्रिल) आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील केंद्रांवर ही परीक्षा होणार असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा या परीक्षेसाठी उमेदवार नोंदणीमध्ये वाढ झाली आहे. पारंपरिक (ऑफलाइन) पद्धतीने होणारी ही शेवटची परीक्षा ठरणार आहे. (SET Exam)
सहायक प्राध्यापक पदासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या (नेट) धर्तीवर राज्यस्तरावर सेट परीक्षा घेण्यात येते. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाच्या माध्यमातून ही परीक्षा होते. गेल्यावर्षी या परीक्षेसाठी एक लाख १९ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. तर यंदा १ लाख २८ हजार २४३ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील १७ शहरांतील २८९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांना डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. या परीक्षेची तयारीची तयारी सेट विभागाने केली आहे.
आतापर्यंत सेट परीक्षा पारंपरिक (ऑफलाइन) पद्धतीने घेण्यात येत होती. मात्र आता नेटच्या धर्तीवर सेट परीक्षाही संगणकआधारित पद्धतीने आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी पारंपरिक पद्धतीने होणारी सेट परीक्षा शेवटची ठरणार आहे, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.