सत्तार जात्यात, भुमरे-कराड सुपात
#अकोला / छत्रपती संभाजीनगर
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच भाजपने कथित गोपनीय अहवाल तयार करून शिंदे गटातील पाच मंत्र्यांना अकार्यक्षम ठरवल्याची चर्चा जोरात असतानाच यातील काही मंत्री अडचणीत आले आहेत, तर काही मंत्र्यांची प्रकरणे बाहेर काढण्याचा इशारा त्यांचे विराधक देत आहेत.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे कृषी विभागाने अकोल्यामध्ये टाकलेल्या धाडीत त्यांच्या कथित पीएचा समावेश असल्यामुळे अडचणीत आले आहेत. त्याचबरोबर, राज्यातील रोजगार हमी योजना आणि फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे तसेच केंद्रातील अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या भ्रष्टाचाराच्या कुंडल्या बाहेर काढण्याचा इशारा ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून त्यांना बदलण्याची सूचना भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केल्याचे वृत्त खात्रीलायक सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आले. महाराष्ट्रातून मिळालेल्या गोपनीय अहवालाच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला होता. मात्र अब्दुल सत्तार, संजय राठोड, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत या पाचही मंत्र्यांनी हे आक्षेप फेटाळले. हा गोपनीय अहवाल फुटल्यानंतर भाजपने आम्ही असा कुठलाही अहवाल तयार केला नसल्याची सारवासारव केली. आता त्यातील काही मंत्र्यांसमोरील अडचणी वाढत आहेत.
कृषी विभागाने अकोल्यामध्ये टाकलेल्या धाडीत समावेश असलेला आणि व्यावसायिकांना लाच मागणारा दीपक गवळी हा अब्दुल सत्तारांचा पीए असल्याचे पत्र समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील दौऱ्यातल्या शासकीय पत्रात गवळीचा सत्तारांचे स्वीय सहायक असा उल्लेख करण्यात आला आहे. या शासकीय पत्राने कृषिमंत्र्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मात्र, अब्दुल सत्तार यांनी हा दावा फेटाळला आहे. दीपक गवळी हा आपला पीए नाही, तर कृषी अधिकारी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावे अकोल्यामध्ये कृषी विभागाच्या पथकाने धाडी टाकल्या होत्या. या पथकात अधिकारी नसलेल्या अनेक खासगी व्यक्तींचाही समावेश असल्याची माहिती समोर आली होती. यात अब्दुल सत्तार यांचा स्वीय सहायक दीपक गवळी याचादेखील समावेश होता. या पथकाने पैशाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका खत कंपनीच्या व्यवस्थापकाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे.
दीपक गवळी हे पीए असल्याचा दावा आज कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी फेटाळला. ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, दीपक गवळी हा कृषी अधिकारी आहे. माझ्या काही शासकीय दौऱ्यात त्यांचा पीए असा उल्लेख झाला आहे. मात्र, ते माझे पीए नाहीत. कृषी विभागातल्या ६२ अधिकाऱ्यांनी मे महिन्यापासून ८६ कारवाया केल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी २६९ कारवाया केल्या आहेत. त्यात हे दीपक गवळीही होते.
कृषी विभागाच्या विरोधात तक्रार करणाऱ्या कंपनीविरोधात कृषी विभागाने कारवाई सुरू केली आहे. मात्र, या धाडीत काही चुकीचे झाले नसल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. या मतदारसंघातील माझ्या सहकाऱ्यांनी मला सांगूनच तेथे हजेरी लावली असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. अकोल्यातून अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे ही कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आता दीपक गवळी नावावरून हे प्रकरण चांगलेच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी रोजगार हमी योजना आणि फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरेंच्या टक्केवारीची प्रकरणे येत्या ८ जुलैला बाहेर काढण्याचा तसेच केंद्रातील अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराडांची कुंडली उघड करण्याचा इशारा दिला आहे. खैरे म्हणाले, ‘‘ संदीपान भुमरे यांच्याकडे ७०० एकर जमीन कुठून आली? भुमरेंची टक्केवारीची सर्व प्रकरण येत्या मी येत्या ८ जुलैला बाहेर काढणार आहे. पैठण येथे शिवसेना शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट करण्यात येईल. कराड यांच्या कुंडल्याही माझ्याकडे आहेत. वेळ आली की त्यादेखील बाहेर काढणार आहे.’’
वृत्तसंस्था