दुर्योधनाच्या बाजूने उभे राहणार असाल, तर कायद्याची पदवी पेटीत बंद करा
दुर्योधनाच्या बाजूने उभे राहणार असाल, तर कायद्याची पदवी पेटीत बंद करून ठेवा, असे खडेबोल खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना मंगळवारी (दि. १६) सुनावले.
पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी नार्वेकर आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ‘‘शिंदे सरकारमुळे महाराष्ट्र दिल्लीच्या दारातले पायपुसणे झाले आहे. राहुल नार्वेकर कायद्याचे जाणकार आहेत. ते अनेक वर्ष शिवसेनेचेच वकील होते. शिवसेनेच्या माध्यमातूनच त्यांचे राजकारण पुढे गेले. त्यांना शिवसेना काय आहे हे माहिती आहे. काय घडले आहे, कसे घडवले,
हे त्यांना माहिती आहे. त्यांना जर दुर्योधनाच्या बाजूने उभे राहायचे असेल, तर त्यांनी त्यांची कायद्याची पदवी पेटीत बंद करून ठेवावी.’’
न्याय करणे यापेक्षा न्यायाला विरोध करणे घटनाद्रोह आहे. ज्याच्या हातात न्यायाचा तराजू आहे, त्याने न्यायाला विलंब करणे देशद्रोह असतो. या महाभारतामध्ये श्रीकृष्ण नाही. या महाभारतामध्ये भीम नाही. या महाभारतामध्ये भीष्ण पितामहसुद्धा नाहीत. ते सगळे तटस्थपणे पाहत आहेत. त्यांनी लढाई चालू ठेवावी. सर्वोच्च न्यायालयाने मेलेल्या पोपटाविषयी भाष्य केलेले आहे. पोपट मेलेलाच आहे. फक्त विधानसभा अध्यक्षांनी ते जाहीर करायचे आहे, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर टीका केली.
देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा पोपट मेल्याचे म्हटले होते. या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले, ‘‘मला असे वाटले होते, या अख्ख्या सरकारमध्ये एकच शहाणा माणूस आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. बाकी सगळे अतिशहाणे किंवा मूर्ख आहेत. देवेंद्र फडणवीसच असे बोलायला लागले असतील, तर शहाणपणाच्या व्याख्या आणि भूमिका बदलाव्या लागतील.’’
मी पुन्हा पुन्हा सांगतो, देवेंद्र फडणीस यांना वकिलीचे चांगले ज्ञान आहे. त्यांना कायदा कळतो, त्यांना प्रशासन कळते. त्यांना राजकारण माहिती आहे. त्यांना पडद्यामागे काय चालले आहे, हे माहिती आहे. ते सगळ्यांच्या संपर्कात आहेत. मात्र, तरीही ते अशी वक्तव्ये करत आहेत. म्हणजे मला त्यांचा काहीतरी नाईलाज दिसतो, असा टोलाही राऊत यांनी फडणवीस यांना लगावला.
वृत्तसंस्था