नाही तर तुमची काय औकात होती?
शिंदे गटाने दिलेल्या ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीवरून भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही, अशा बेछूट शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाने भाजपची औकातच काढली. ‘‘बाळासाहेब ठाकरेंचे बोट पकडून आपण मोठे झाला आहात. नाहीतर आपली काय औकात होती, हे लक्षात ठेवले पाहिजे,’’ अशा तिखट शब्दांत शिंदे गटाचे विदर्भातील आमदार संजय गायकवाड यांनी भाजप आणि बोंडे यांना सुनावले.
भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी जाहिरातीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत खोचक टीका केली होती. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांना ठाणे म्हणजेच महाराष्ट्र वाटत असल्याचा हल्लाबोल अनिल बोंडे यांनी केला होता. बोंडे यांच्या या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जशास तसे उत्तर दिलं आहे. ‘‘शिवसेना आणि एकनाथ शिंदे हे वाघ आहेत. ४० वाघांमुळेच भाजपच्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान आहे. ,’’ असं जोरदार प्रत्युत्तर संजय गायकवाड यांनी दिलं. भाजपकडून शिवसेनेच्या मतदारसंघात हस्तक्षेप करण्यात येत आहे. त्यावरूनही गायकवाड यांनी भाजपला दम भरला.
‘‘शिवसेनेच्या मतदारसंघात हस्तक्षेप करणे थांबवा. तुम्ही कोणाच्या संगतीने मोठे झालात याचाही विचार करा. बाळासाहेब ठाकरेंचे बोट पकडून आपण मोठे झाला आहात. नाहीतर आपली काय औकात होती, हे लक्षात ठेवले पाहिजे,’’ असं सांगतानाच अनिल बोंडे यांनी आत्मचिंतन करून बोलावं, असा सल्लाही गायकवाड यांनी दिला. ‘‘मुख्यमंत्र्यांची वाहवा जर जनता करत असेल तर ते कटू सत्य पचविण्याची ताकत ठेवावी. आमच्या नेत्याबद्दल अशी भाषा करत असतील तर वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालावं, असं आवाहन गायकवाड यांनी केलं आहे.
वृत्तसंस्था