तुमची युती मी तोडून दाखवतोच
#सातारा
‘‘तुम्ही माझे घर फोडले, आता मी तुमची युती तोडून दाखवतो,’’ असे थेट आव्हान माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला सोमवारी (दि. ५) दिले.
आमदार शिंदे यांचे बंधू आणि माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. यावर प्रतिक्रिया देताना आमदार शिंदे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. ‘‘त्यांनी माझ्या भावाला त्यांच्या पक्षात घेत माझे घर फोडले आहे, आता मी त्यांची युती तोडून दाखवतो,’’ असेही आमदार शिंदे म्हणाले.
भाजपकडे स्वतःची ताकद नाही. त्यामुळे इतर पक्षांच्या नेत्यांवर दबाव टाकण्यात येतो. या दबावाच्या राजकारणातून ताकद वाढवण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना आयात करून भाजपने पक्ष वाढवला. मात्र, आमची सत्ता आल्यानंतर ते पुन्हा आमच्याकडे येतील आणि त्यानंतर तुमच्या दबावाला पळी पडणार नाही, असेदेखील आमदार शशिकांत शिंदे यांनी नमूद केले.
नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) हे आपले विरोधक आहेत, असं आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं, पण आता शिंदेंचे बंधूच विरोधकांना जाऊन मिळाल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. ऋषिकांत शिंदे यांच्या या प्रवेशामुळे आमदार शिंदे यांना मोठा धक्का बसला असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. आता शशिकांत शिंदे काय भूमिका घेतात, याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.
वृत्तसंस्था