‘... तर राणेंना सोडणार नाही’: मनोज जरांगे पाटील

मुंबई: मी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या वयाचा आदर करतो. मी त्यांना आजवर कधी काही बोललो नाही. ते जर असेच बरळत असतील तर मी पुढच्या वेळी त्यांना सोडणार नाही. मलासुद्धा काही मर्यादा आहेत.

Manoj Jarange Patil

संग्रहित छायाचित्र

मनोज जरांगे पाटील यांची सडकून टीका, वडिलांना समजावून सांगण्याचा नीलेश राणेंना सल्ला

मुंबई: मी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या वयाचा आदर करतो. मी त्यांना आजवर कधी काही बोललो नाही. ते जर असेच बरळत असतील तर मी पुढच्या वेळी त्यांना सोडणार नाही. मलासुद्धा काही मर्यादा आहेत. अन्यथा मी इथून पुढे धुवून काढेन. तसेच यांचे पुत्र नीलेश राणे (Nilesh Rane) यांना माझी  विनंती आहे की, त्यांनी त्यांच्या वडिलांना समजावून सांगावं. अन्यथा मी त्यांचा आदर करणार नाही, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. आंतरवाली सराटी येथे उपोषण स्थळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. तसेच राणे यांना खऱ्या मराठ्यांची ताकद दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. 

राणे यांच्या टीकेवर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी नारायण राणे यांना शेवटचं माफ करतो आणि सुट्टी देतो. परंतु, माझं नीलेश राणे यांना सांगणं आहे की, तुम्ही नारायण राणेंना थांबवा. कारण मलासुद्धा काही मर्यादा आहेत. अन्यथा मी इथून पुढे धुवून काढेन, कोणालाही सोडणार नाही. मी माझ्या मर्यादा सांभाळतोय. मी कधी तुम्हाला काही बोललो नाही. माझ्या तोंडून नारायण राणेंबद्दल एकही शब्द निघालेला नाही. मी त्यांच्याबद्दल ब्र शब्दही उच्चारलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओबीसी असल्याचा अभिमान आहे. त्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणात त्याचा उल्लेख केला आहे. मग आम्हाला मराठा असल्याचा अभिमान का असू नये? (Maratha Reservation News)

जरांगे पाटील म्हणाले, माझा नारायण राणे यांना प्रश्न आहे की, तुम्ही तर पूर्वी मराठा-मराठा करून छाती बडवत होता. मग आता तुम्हाला काय झालंय. मी मराठ्यांसाठी बोलतोय. त्यामुळे तुम्ही माझ्या बाजूनं बोलायला हवं होतं. तसेच मी तुम्हाला कधी काही बोललो नाही, तुमच्याबद्दल एक शब्दही काढला नाही. मग तुम्ही कोणाची री ओढताय? मोदींना ओबीसी असल्याचा अभिमान आहे. तसाच मला मराठ्यांचा अभिमान आहे. उगाच काहीही बोलायला तुम्ही एकटेच तिरसिंगराव लागून गेलात का?

“…अन्यथा पाणउतारा करेन”

मनोज जरांगे राणे यांना उद्देशून म्हणाले, मला काही मर्यादा असल्याने मी शांत आहे. मी माझ्या मर्यादा पाळतोय. मी तुम्हाला आजवर मानत होतो, आताही मानतो, म्हणूनच मी कधी तुम्हाला काही बोललो नाही. त्यामुळे माझी शेवटची विनंती आहे. तसेच माझी नीलेश राणे यांना विनंती आहे की, नारायण राणे यांना समजावा. कारण पुढच्या वेळी मी त्यांना सोडत नसतो. माझ्यापुढे कोण आहे हे मी बघणारच नाही. कोण आहे, काय आहे, किती मोठा माणूस आहे, असलं काही मी बघणार नाही. राणे मोठे आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला आमच्याकडून डाग लागणार नाही, याची आम्ही काळजी घेतो. तुम्ही आमची भावना समजून घ्या, अन्यथा मी त्यांचा पाणउतारा करेन. राणे यांना आतापर्यंत पाच वेळा इशारा दिला आहे. परंतु, ते काही ऐकत नाहीत. आता मी त्यांना शेवटची संधी देतोय. उद्या ते काही बोलले तर मी त्यांना सोडणार नाही. आता एका तासाने बोलले तरी मी त्यांना सोडणार नाही. त्यांना खेटायचंच असेल तर माझीही तयारी आहे.

काय म्हणाले होते राणे ?

राणे यांनी दोन दिवसांपूर्वी टीका करताना समाज माध्यमावर म्हटले होते की, मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम झाल्‍यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्‍याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्‍ट्रात फिरू देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्‍याने आता मर्यादा ओलांडली आहे. पंतप्रधान जेव्‍हा महाराष्‍ट्रात येतील त्‍यावेळी जागेवरून हलून दाखव, तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून नाटकं करावी.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest