फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांधांना प्रोत्साहन कसे मिळते?

देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध शक्तींना प्रोत्साहन कसे मिळत आहे, असा गंभीर सवाल करीत कॉंगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शांतता आणि सुव्यवस्था राखण्यात शिंदे-फडणवीस सरकार अपयशी ठरल्याची टीकादेखील केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 8 Jun 2023
  • 07:37 am
फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांधांना प्रोत्साहन कसे मिळते?

फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांधांना प्रोत्साहन कसे मिळते?

काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल, सरकार अपयशी ठरल्याची टीका

#नागपूर

देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध शक्तींना प्रोत्साहन कसे मिळत आहे, असा गंभीर सवाल करीत कॉंगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शांतता आणि सुव्यवस्था राखण्यात शिंदे-फडणवीस सरकार अपयशी ठरल्याची टीकादेखील केली.

महाराष्ट्रात कटकारस्थान करून सत्तेत आलेले शिंदे-फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून पोलिस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. औरंगजेबाचे उदात्तीकरण सुरू आहे, असे करणारे आत्ताच बिळातून बाहेर कसे आले? राज्यात रोज दंगली सुरू आहेत. मुख्यमंत्री व गृहमंत्री काय करत आहेत? शिंदे फडणवीस सरकार नपुंसक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते ते खरेच आहे, असे नाना पटोलेंनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, शेवगाव, अमरावती, नाशिकमध्ये धार्मिक मुद्द्यांना हवा देऊन राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न मागील महिन्यात झाला. पण लोकांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने तो प्रयत्न फसला. आता पुन्हा धर्मांध शक्ती अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात औरंगजेबाचा मुद्दा पुढे करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मागच्याच महिन्यात राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला पण तो फसला. त्यामुळे आता औरंगजेबाचा मुद्दा पुढे करून वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचसोबत मुंबईसारख्या सुरक्षित शहरामध्ये एका विद्यार्थिनीची वसतिगृहात अत्याचार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. राज्यात पोलिसांचे नाही तर समाजकंटकाचे आणि गुन्हेगारांचे राज्य आहे, असा आरोप पटोले यांनी केला आहे.  

फडणवीस यांचे गृहखात्यावर आणि पोलिसांवर नियंत्रण राहिलेले नाही, त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही पटोले यांनी केली. वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest