संग्रहित छायाचित्र
मुंबई : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड झाल्यावर उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, एनडीएने सत्तास्थापनेचा दावा केला असला तरीही सरकार चालवताना मोदींच्या नाकी नऊ येतील. एनडीए आहे कुठे? चंद्राबाबू आणि नितीश कुमार म्हणजे एनडीए का ? हे दोघं तर सगळ्यांचेच आहेत. आज ते तुमच्याकडे आहेत, उद्या आमच्याकडे येतील. अग्निवीर योजनेला सरकार स्थापनेआधीच विरोध झालाय. इतर योजनांनाही विरोध होईल. उद्या राम मंदिरालाही ते विरोध करू शकतात. चंद्राबाबू मुस्लीम आरक्षणाच्या बाजूने आहेत. अनेक मुद्दे आहेत, ज्यावर चर्चा सुरू आहे. त्यांना सरकार बनवायचं आहे, बनवू द्या. मोदींकडे आणि भाजपाकडे बहुमत नाही. मोदी म्हणायचे मी काँग्रेसमुक्त भारत करणार. मात्र आम्ही सगळ्यांनी मिळून भाजपाला बहुमत मुक्त केलं आहे. देशात फक्त राजकीय विरोधकांच्या मागे ईडी लावली जाते. जो न्याय प्रफुल्ल पटेलांना लावला, तोच सगळ्यांना लावला पाहिजे. तसेच मोदी म्हणजे बडा राजन आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे छोटा राजन आहेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.
राऊत म्हणाले, शिंदे गटाचे खासदार चोऱ्यामाऱ्या करून निवडून आले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांना परदेशात चार हाय कमिशनरची पदेही देणार आहेत. अजून काय काय मागणार आहेत माहीत नाही. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जात असतील, तर तो त्यांचा निर्णय. त्यांच्या पक्षाचं हायकमांड दिल्लीत आहे. महाराष्ट्रात पराभव झालाय तर तिथे बोलवलं गेलं. आमचा पराभव जिथे झाला त्याची मीमांसा आम्ही करणार आहोत. तसं भाजपालाही करावंच लागेल. महाराष्ट्रात काय करायला गेले आणि काय झालं? यावर चिंतन होईल. हा त्यांचा विषय आहे. काँग्रेस म्हणते त्याप्रमाणे खोटे बोलणारे नरेंद्र मोदी आहेत. खोट्यांचे सरदार मोदी आहेत. देवेंद्र फडणवीस छोटे सरदार आहेत. एक बडा राजन आणि दुसरा छोटा राजन. खोटं बोलण्यास सुरुवात कुणी केली तर मोदी आणि शाह यांनी केली. त्यामुळे त्यांनी आम्हाला काही शिकवायला जाऊ नये.