उदयनराजेंच्या चित्राला पालकमंत्र्यांचा विरोध?
#सातारा
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाक्यावरील 'कोयना दौलत' या निवासस्थानाजवळील खासदार उदयनराजे यांची मालकी असलेल्या इमारतीच्या भिंतीवर सोमवारी रात्री क्रेनच्या साहाय्याने पेंटिंग काढण्यात येणार होते. मात्र सातारा पोलिसांनी हे पेंटिंग काढण्यास विरोध करत संबंधित क्रेन आणि उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांना मज्जाव केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उदयनराजेंच्या मालकीची इमारत असतानाही त्यांच्याच चित्राला पोलीस कुणाच्या आदेशाने विरोध करत आहेत, अशी चर्चा साताऱ्याच्या नाक्या-नाक्यावर सुरू आहे.
पोलिसांच्या कारवाईनंतर मंगळवारी सकाळी पेंटरकडून पुन्हा पेंटिंग काढण्याचे काम सुरू करण्यात आले. परंतु काही वेळातच पेंटरला पोलिसांनी पुन्हा काम थांबवण्यास सांगितले. त्यावेळी पोलीस व पेंटर पाटोळे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. पोलिसांनी पेंटरला ताब्यात घेतल्याने तिथे काही वेळ तणाव निर्माण झाला. पेंटिंग काढू न दिल्यास इमारतीवरून उडी मारण्याचा इशारादेखील पेंटरने दिला आहे. ज्या इमारतीवर उदयनराजेंचे चित्र काढण्यात येणार आहे, त्या इमारतीची मालकी उदयनराजेंकडे आहे, असे प्रीतम कळस्कर यांनी सांगितले. पेटिंग करणाऱ्या पेंटरला खाली उतरवल्यानंतर पोलीस मुख्यालयात उदयनराजे समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
उदयनराजे भोसले हे माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांचे चित्र काढले तरी मला आनंदच आहे. यात वाईट वाटण्यासारखे काहीच नाही, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली होती. मात्र शंभूराज देसाई यांच्याच दबावावरून पोलीस हे पेंटिंग करण्याला विरोध करत असल्याची चर्चा दबक्या आवाजात साताऱ्यात सुरू आहे. साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांचे चित्र काढण्यावरून उदयनराजे यांचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चांगलाच वाद पाहायला मिळतो आहे. मंत्री शंभुराज देसाई यांनी यावर प्रतिक्रिया देत कोणतेही विनापरवाना कृत्य साताऱ्यात सहन केले जाणार नाही. वेळप्रसंगी कायद्याचा वापर करावा लागला तरी चालेल, असा इशारा दिला आहे. मात्र, याच विषयावर उदयनराजेंचे कार्यकर्ते शंभुराज देसाई यांच्या सोबत चर्चेसाठी आले असताना शंभुराज देसाई यांनी त्यांची भेट घेण्याचे टाळले आहे.वृत्तसंस्था