शासन आपल्या दारी अन् अधिकारी मंत्र्यांच्या घरी
#मुंबई
राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी (दि. २०) केला.
सरकारने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पहाटे ४ वाजता काढून ते अधिकृतरित्या प्रसिद्ध न करता अधिकाऱ्यांना व्हाट्सॲपवर का दिले, असा सरकारला अडचणीत टाकणारा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.
दानवे म्हणाले, महसूल विभागात २०० बदल्या झाल्या असून त्या खालोखाल वन, कृषी, उत्पादन शुल्क विभागात मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या असून यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला. ‘शासन आपल्या दारी अन् अधिकारी मंत्र्यांच्या घरी,’ असा प्रकार सध्या सुरू आहे.
वनविभागात झालेल्या बदल्यांबाबत भाजपच्याच चार आमदारांनी तक्रार केल्यानंतर त्या बदल्या थांबविण्यात आल्या. कृषी विभागाच्या सचिवांनी या बदल्या होऊ शकत नाही, सदर बदलीस ते अधिकारी पात्र नाही, असा शेरा मारला असतानाही पदोन्नती केल्या गेल्या. उत्पादन शुल्क विभागात वर्ग तीन आणि चारचे अधिकार सचिवांकडे असताना मंत्र्यांनी बदल्या केल्या असल्याचा आरोप करत दानवे यांनी बदल्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराबाबत सरकारवर ताशेरे ओढले.
या सरकारच्या एका वर्षापेक्षाही कमी काळात सरकारी बदल्यांमध्ये भ्रष्टाचाराने थैमान घातले आहे. जो अधिकारी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देईल, गैरव्यवहार करेल त्याला हवे त्या ठिकाणी पोस्टिंग मिळते. दुसरीकडे, जे मंत्र्यांच्या मनाविरुद्ध काम करेल त्यांना पध्दतशीरपणे बाजूला केले जात आहे, असा गंभीर आरोपदेखील दानवे यांनी केला.
वृत्तसंस्था