संग्रहित छायाचित्र
मुंबई: शिखर बँक घोटाळा प्रकरणी ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टोलेबाजी केली असून शिखर बँक घोटाळा प्रकरणात क्लीन चिट मिळणं हाच सगळ्यात मोठा घोटाळा असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.
राऊत म्हणाले, अशा पद्धतीने हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचे आरोप करत खटले चालवायचे, त्यासाठी लाखो, कोट्यवधी रुपये सरकारच्या खात्यातून खर्च करून खटले चालवायचे आणि मग तो आरोपी आपल्या पक्षात आला की त्याच्याबद्दल चांगलं बोलायचं, त्याला क्लीन चिट द्यायची, आरोपांमधून मुक्त करायचं. त्यामुळे आता खटला चालवताना जो काही खर्च झाला तो कोणाच्या खिशातून वसूल करणार ते सरकारने स्पष्ट करावं. यासाठी नरेंद्र मोदी यांच्या खिशातून पैसे घेणार का ते सांगावं.
शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा अडचणीत आले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह बँकेच्या संचालक मंडळावरील ८० जणांना क्लीन चिट दिली होती. मात्र अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लीन चिटला विरोध केला आहे. ईडीने विशेष न्यायालयात या संदर्भात एक अर्ज दाखल केला आहे.
तसेच आठ साखर कारखान्यांनीही अजित पवार यांच्याविरोधा खटला दाखल केला आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अजित पवार यांच्यासह बँकेच्या एकूण ७० जणांवर गुन्हा दाखल केला होता. यामध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि पुतणे रोहित पवार (आमदार) यांचाही समावेश होता. सुनेत्रा पवारांना लोकसभा निवडणुकीच्या आधी क्लीन चिट मिळाली होती.