संग्रहित छायाचित्र
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन उर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे याला मुंबई उच्च न्यायालयाने जया शेट्टी हत्याकांड प्रकरणी बुधवारी जामीन मंजूर केला. मुंबई सत्र न्यायालयाने छोटा राजनला दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला देखील स्थगिती दिली. छोटा राजन याने शिक्षेला दिलेले आव्हान जोपर्यंत निकाली लागत नाही तोपर्यंत ही स्थगिती के राहणार असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने छोटा राजनला जामिनासाठी 1 लाख रुपयांचे जातमुचलका भरण्याचे निर्देश दिलेत. न्यायालयाने छोटा राजनला जामीन मंजूर केला असला तरी त्याला इतर प्रकरणांमध्ये झालेल्या अटकेमुळे त्याचा मुक्काम कारागृहातच राहाणार आहे
जया शेट्टी हत्याकांड प्रकरण
जया शेट्टी या एक हॉटेल व्यावसायिक होत्या. त्या मुंबईतील गामदेवीमध्ये गोल्डन क्राउन हॉटेलच्या मालक होत्या. 4 मे 2001 रोजी जया शेट्टीची खंडणीसाठी छोटा राजन गँगच्या कथित सदस्याने गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ही हत्या छोटा राजनच्या इशाऱ्यावरून झाली असा आरोप करण्यात आला. जया शेट्टी यांच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली. मात्र त्यांनी खंडणी देण्यास नकार दिल्याने त्यांना गोळ्या घालून मारण्यात आले. त्यांना गँगस्टर्सकडून मिळणाऱ्या धमक्यांमुळे शासनाने शेट्टी यांना सुरक्षा पुरवली होती. नंतर ही सुरक्षा काढून घेण्यात आली. त्यानंतर दोनच महिन्यांत शेट्टी यांची हत्या करण्यात आली.
या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने छोटा राजनला या प्रकरणात दोषी ठरवले. या प्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले होते.