मुंबई पाण्यात अडकली
मुंबई: राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत येत्या २४ तासांत जोरदार पाऊस पडू शकतो. तसेच मराठवाडा आणि विदर्भातही अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी रविवार रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा कोलमडली आहे. मध्य, ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गांवर पाणी साचल्याने रेल्वे सेवा धिम्या गतीने चालू आहे. रस्तेदेखील पाण्याखाली गेले आहेत. अनेक रस्ते आणि चौकांमध्ये पाणी साचलं आहे. शहराच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, साचलेल्या पाण्याचा निचरा होत आहे. तसेच सखल भागात पालिका आणि रेल्वेने पाणी उपसण्यासाठी पंप बसवले होते. त्या पंपांनी त्यांचं काम केल्यामुळे आता पाण्याचा निचरा होऊन रेल्वे सेवा सुरळीत होत आहे. हार्बर रेल्वे सेवा सुरू झाली आहे. मध्य रेल्वे सुरळीत झाली आहे. मुसळधार पाऊस आणि समुद्राची भरती एकावेळी आल्याने मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुसळधार पावसामुळे राज्यात आणि मुंबईत निर्माण झालेली पूर परिस्थिती आणि एकंदर अतिवृष्टीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला. यावेळी मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आपत्ती विभागाच्या सचिव सोनिया सेठी आदी उपस्थित होते. जेव्हा भरती आणि मुसळधार पाऊस दोन्ही एकत्र येतात. तेव्हा पाण्याची परिस्थिती अधिक कठीण होते. तसेच पोलीस विभागासह संपूर्ण स्थानिक आणि राज्य प्रशासन मदतीसाठी प्रयत्नशील आहे. कृपया आवश्यक असेल तरच बाहेर पडा. मुंबईकरांनो सुरक्षित राहा, काळजी घ्या, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
महालक्ष्मी पाच तासांनी पोहोचली
कोल्हापुरहून रविवारी रात्री निघालेली महालक्ष्मी एक्स्प्रेस सोमवारी पहाटे मुंबईच्या पावसात अडकली. नियोजित वेळेपेक्षा तब्बल पाच तासांनी ही गाडी मजल दरमजल करत सीएसएमटी स्थानकात पोहोचली. अंबरनाथ येथे अडकलेल्या गाडीने २०१९ मधील पुराच्या आठवणी जाग्या केल्या. मुंबईत मध्यरात्री सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पहाटे ६:३० नंतर विश्रांती घेतली होती. काही भागात हलक्या सरी कोसळत होत्या.