मनोहर जोशी
माजी लोकसभा अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जी. जोशी यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना हिंदुजा या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर आय़सीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
मनोहर जोशी यांना काल रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्याात आले आहे. मनोहर जोशी यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते. हिंदुजा रुग्णालयतील वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
सध्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी हिंदुजा रुग्णालयात धाव घेतली आहे. तसेच पक्षाच्या इतर नेतेही जोशी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. भारतीय जनता पक्षासोबत युती करून सत्तेत आल्यानंतर जोशी हे चार वर्षे (१९९५-१९९९) शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होते. नंतर, त्यांनी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात लोकसभा अध्यक्ष (२००२-२००४) म्हणून काम पाहिले. काँग्रेसचे शिवराज पाटील (१९९१-१९९६) यांच्या नंतर राज्यातून लोकसभा अध्यक्षाचे काम पाहणारे जोशी हे दुसरे नेते होते.