आधी हाणले मटण मग मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस !
मुंबई, मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांच्यावर अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांनी आरोप केले आहेत. मनोज जरांगे यांची लढाई गोरगरीब मराठ्यांसाठी आणि लेकराबाळांसाठी नव्हती. ज्यांना ओबीसीच्या कोट्यातून सरपंच व्हायचे होते, त्यांच्यासाठी जरांगे यांची ही लढाई होती. वाशीमध्ये ज्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडले, त्याच्या आदल्या दिवशी जरांगे यांनी मटण खाल्ले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या घरी ज्यावेळी यायला निघालात त्यावेळी तुम्ही रात्री जेवण केलात’ असा आरोप अजय महाराज बारसकर यांनी केला आहे. मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत.
अजय महाराज बारसकर यांनी यापूर्वीही मनोज जरांगे यांच्यावर कडाडून टीका केली होती. बारसकर म्हणाले की, जरांगे यांनी आरक्षणाचे आंदोलन निवडणुकीपर्यंत कसे भरकटवले यासाठी ही पत्रकार परिषद आहे. मला काही लोकांनी सांगितले की, महाराज तुम्ही एक महिनाभर शांत राहा, त्यांना त्यांच्या पद्धतीने आंदोलन करू द्या म्हणून मी शांत होतो. जरांगे यांच्यावर विश्वास होता म्हणून त्यांना एवढा मोठा पाठिंबा मिळाला, पण आता अशा काही घटना घडल्या ज्याने त्यांची विश्वासार्हता कमी झालेली आहे. जरांगे यांनी लोणावळ्यात बंद दाराआड चर्चा केली. आरक्षणाचा लढा हा राजकीय लढा झाला. परवाच्या बैठकीला जे सच्चे मराठे गेले होते त्या लोकांनी जरांगे यांना शिव्या घातल्या आहेत. अशोक चव्हाण हे परवा रात्री तिकडे गेले, जरांगे यांना भेटले आणि माध्यमांना प्रतिक्रियाही दिली. तुम्ही म्हणाला होतात सीएम, डीसीएम सोबत फेसटाईमवर चर्चा केली आणि त्यावेळी मोबाईलवर मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग केले.
अशोक चव्हाण यांच्या भेटीवेळी काय चर्चा झाली त्याचं रेकॉर्डिंग जगासमोर आणा, असे बारसकर म्हणाले. यांची लढाई कधीच गोरगरीब मराठ्यांसाठी नव्हती
मनोज जरांगे यांची लढाई गोरगरीब मराठ्यांसाठी आणि लेकराबाळांसाठी नव्हती. ज्यांना ओबीसीच्या कोट्यातून सरपंच व्हायचे होते. त्यांच्यासाठी जरांगे यांची ही लढाई होती. त्याने जे काही सुरू केले त्यानंतर मराठा तरुणांवर गुन्हे दाखल झाले. ओबीसी आणि मराठा समाजात भांडणे लावली गेली. एकेक मराठा अपक्ष उमेदवार उभा करण्याची पहिली डील झाली आणि आता मविआसोबत दुसरी डील सुरू आहे, असा आरोप बारसकर यांनी केला. मविआचा उमेदवार असेल तिथे उमेदवार उभा करणार नाही ही दुसरी डील सुरू आहे. यांच्या आंदोलनाचा चार दोन लोकांना फायदा झाला, असेही ते म्हणाले.
ज्यांच्या हाताने तुम्ही उपोषण सोडले त्या महिलेने तिसऱ्या दिवशी नवी कोरी गाडी घेतली. कुठून आले पैसे ?? असा खडा सवालही बारसकर यांनी विचारला आहे. तुम्ही आता फडणवीस साहेब, फडणवीस साहेब म्हणायला लागले. एसआयटी चौकशीला घाबरलात, असा आरोप बारसकर यांनी केला. जरांगे पाटील लोकांना भ्रमित करतोय. तिकडे अरविंद केजरीवाल चौकशीला घाबरले नाहीत तुम्ही कशाला घाबरताय. हा दहावी-बारावी छाप, पास झाला की नापास माहीत नाही पण याने कसलही ज्ञान नसताना सगळ्यांना भरकटवले. लोकसभेत आपले काही गुंतले नाही. आरक्षण जे मिळणार आहे ते राज्यात मिळणार आहे असे ते म्हणाले. लोकसभेचा काहीच फायदा नाही का ? किती मराठ्यांना फायदा झाला हे जरांगेने सांगावे. वाशीम जिल्ह्यातली एक भगिनी आहे. ती नायब तहसीलदार झाली होती पण कुणबी प्रमाणपत्रामुळे ती कलेक्टर झाली असे भ्रामक विधान त्याने केले. तो लोकांना भ्रमित करतोय असा आरोप बारसकरांनी केला. तू कोणाच्या डोक्यावर हात ठेवतो ते सांग आम्हाला. बारामतीच्या डोक्यावर हात ठेवतो की आणखी कोणाच्या डोक्यावर हात ठेवतो, असा सवालही त्यांनी विचारला.