अखेर एमपीएससीने नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची लाट
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने एका ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. राज्य लोकसेवा आयोगाची नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. या निर्णयाबरोबरच एमपीएससीने शेवटी माघार घेतल्याचं दिसत आहे.
मंगळवारपासून पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच आंदोलन सुरू आहे. आयबीपीएस आणि राज्य लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा या एकाच दिवशी होणार असल्याने विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आलं. विविध राजकीय पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे मंगळवारी रात्रीपासून आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले होते. तसेच शरद पवार यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर आपण स्वतः घटनास्थळी जाऊन आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला होता.
दरम्यान एमपीएससीच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.