अखेर मराठा आरक्षणाचा गुलाल उधळला
नवी मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पीत मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले. मुख्यमंत्री शिंदे यांनी वाशीला जावून शासनाने काढलेला जीआर जरांगे पाटलांकडे सुपूर्त केला. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा गुलाल उधळला गेला. (Maratha Reservation)
जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांनी अध्यादेश काढला. त्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांचे धन्यवाद. कुणबी नोंद मिळाल्या त्यांच्या सर्व सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. या गुलालाचा अपमान होवू देऊ नका. अध्यादेश आला असला तरी ही कळकळीची विनंती आहे.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, ज्या ५४ लाख नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्या. त्या आधारावर त्यांच्या परिवारातील लोक, सगेसोयरे आणि नातेवाईक, जेथे लग्नाच्या सोयरिकी जुळतात त्या सर्वांना तातडीने कुणबी प्रमाणपत्रे मिळावी. आरक्षणाच्या मागणीसाठी आपण मागील साडेचार महीने संघर्ष केला. या साठी ३०० पेक्षा जास्त मराठा पोरांनी आत्महत्या केल्या. अण्णासाहेब पाटील, मेटे साहेब, जावळे साहेब यांच्या आणि या ३५० लोकांच्या स्वप्नाची पूर्तता करण्याची जबाबदारी आपल्यावर होती.
मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे शिंदे समितीला आणखी एक वर्ष काम करु द्या, गोरगरिब मराठ्यांचं भलं होऊद्या. १८८४ ची जनगणना स्वीकारण्यात यावी, त्यामुळे मराठवाड्यातील मराठ्यांचे भले होईल, असे ते सांगितले.
तसेच मराठा आणि ओबीसी असा वाद होवू दिला नाही. माझ्या जातीचा मला अभिमान आहे. माझी जात माझ्या शब्दापुढे गेली नाही. अनेक जणांनी आम्हाला छेडलं. आमचा नाईलाज झाला. तरीही आम्ही मराठा आणि ओबीसी असा वाद होवू दिला नाही. असे ते म्हणाले.