शेतकऱ्यांना मिळणार २४ तास वीज ?

निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारची मोठी घोषणा, ९ हजार मेगा वॅट सौरऊर्जा योजनेचा करार

Farmerswillget24hourselectricity?

शेतकऱ्यांना मिळणार २४ तास वीज ?

#मुंबई

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसाची वीज मिळणार आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री शेतीचे पंप सुरू ठेवण्यासाठीचा खटाटोप संपणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा थ्री फेज वीज मिळत नाही. त्यामुळे त्यांना रात्रीच्या वेळी शेतीला पाणीपुरवठा करावा लागतो. रात्रीच्या वेळी शेताकडे जाताना बिबटे अन्य जनावरांकडून शेतकऱ्यांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.  या आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना आता २४ तास अगदी स्वस्तात वीज मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने या विषयीचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना अवघ्या दोन रुपयांत वीज मिळेल. या सर्व योजनेचा गोषवाराच फडणवीस यांनी सांगितला आहे. राज्यात दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेत ४० हजार कोटीची गुंतवणूक होऊन २५ हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे. तसेच २०२५ मध्ये  ४० टक्के कृषी फिडर सौर ऊर्जेवर येणार आहेत. १८ महिन्यात प्रकल्प पूर्ण करायचा आहे, पण सोबत काम केले तर १५ महिन्यांतही काम पूर्ण होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

महावितरण ही नवरत्न कंपनी करण्याचा संकल्पही त्यांनी सोडला. वीज कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या अडचणी तातडीने सोडवण्याचे आश्वासन पण त्यांनी दिले. राज्य सरकारने आतापर्यंत दीड लाख पंप दिले आहेत, पण आता आपण या एकाच वर्षांमध्ये ८ लाख सोलर पंप मंजूर करून निधीचा पुरवठा केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 'मागेल त्याला' सोलर पंप देण्यात येणार आहे. सध्या पाच लाख सोलरची मागणी असून राज्य सरकारकडे आठ लाख सोलर पंप असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे रात्रीच्या विजेचे संकट आम्ही संपवू, असे वचन दिले होते. त्याप्रमाणे ते आम्ही पूर्ण करू. दीड वर्षात आता ५० टक्के शेतकऱ्यांचे हे संकट संपवण्याचे अभिवचन त्यांनी दिले.

महावितरण होणार नवरत्न

सध्या सबसिडीवर राज्य सरकार १३ हजार कोटी रुपये खर्च करते. सौर पंपामुळे हा खर्च वाचेल, तर औद्योगिक विजेचा दर पण काही प्रमाणात बदलता येतील. सध्या जी ॲग्री सोलर कंपनी काढलेली आहे, त्याच्या आधारावर पुरत्या तीन ते चार वर्षांमध्ये महावितरण कंपनीला नवरत्न कंपनीमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आजच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. तर २५ हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे ऊर्जामंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest