जनतेच्या मनात फडणवीस : बावनकुळे
#मुंबई
सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याने साहजिकच त्यांचे नाव पुढे येणार आहे. जनतेच्या मनात नेता म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीवरून निर्माण झालेल्या वादावर मंगळवारी (दि. १३) व्यक्त केली.
कोणामुळे कोणाचे महत्त्व कमी होत नाही, असे स्पष्ट करून बावनकुळे म्हणाले, ‘‘जी काही जाहिरात प्रकाशित झालेली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीवर कोणताही परिणाम होणार नाही. नेता म्हणून राज्यातील जनतेच्या मनात देवेंद्र फडणवीस आहेत. सलग दोन वेळा त्यांना पसंती देण्यात आली. आता शिंदे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांचे नाव समोर येणे साहजिक आहे.’’
बावनकुळे पुढे म्हणाले, शिंदे-फडणवीस यांच्या मनामध्ये स्वत:बद्दल मोठेपणाची आणि दुसऱ्याला लहान ठरवण्याची भावना येत नाही. या सरकारला जनतेकडून अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम हे सरकार करेल. त्यामुळे या जाहिरातीकडे न जाता लोकांच्या मनात कोण आहे, याकडे लक्ष देण्याचे गरजेचे आहे.’’
सर्वेक्षणाला कोणताही अर्थ नाही
जनता पसंती ठरवते, जाहिरात किंवा सर्वेक्षणावरून ते ठरवता येणार नाही. महाराष्ट्रात आणि राज्यात चांगली कामगिरी आणि जनतेसोबत संवाद आहे. त्यामुळे सर्वेक्षणाला काही अर्थ नाही, असे सांगून बावकुळे म्हणाले, ‘‘कधी कधी ‘हेड ऑफ द गव्हर्नमेंट’ म्हणून व्यक्तीचे नाव असते. राज्यात सध्या शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांचे नाव आघाडीवर असते. त्यामुळे कोण मोठे, कोण लहान असा अंदाज लावता येणार नाही.’’
दरेकरांचीही उघड नाराजी
‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीवरून उघड नाराजी व्यक्त करणाऱ्या भाजप नेत्यांमध्ये प्रवीण दरेकर यांचाही समावेश आहे. ते म्हणाले, एखाद्या सर्व्हेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पसंती दर्शवली असेल तर आम्हाला आनंदच आहे. ते आमच्या युतीचे मुख्यमंत्री आहेत. जाहिरात करण्यात आमची अडचण नाही. मात्र, यामध्ये शिंदे यांना जास्त पसंती दाखवली आहे. मात्र फडणवीसांना कमी दाखवण्याची गरज नव्हती. शिंदे यांच्या संदर्भातील आकडेवारी दिली असती तर बरे झाले असते. अशी जाहिरात देणे युतीसाठी योग्य नाही. युतीचे वातावरण कलुषित करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपकडे तिप्पट आमदार आहेत. भाजपने त्याग केला. जास्त आमदार असूनही फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले. त्याचे मूल्यमापन करणार आहात की नाही? कुठल्याही वक्तव्यातून युतीत दुरावा किंवा तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे.’’
वृत्तसंस्था