समृद्धी महामार्गाचे फडणवीसांचे स्वप्न ठरत आहे जीवघेणे : वडेट्टीवार
#मुंबई
गेल्या काही महिन्यांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. त्यामुळे बुधवारी विधिमंडळात अपघातांवर तोडगा निघेपर्यंत महामार्ग बंद ठेवण्याची आग्रही मागणी विरोधी पक्षांनी केली. समृद्धी महामार्ग देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे. पण त्यांचे स्वप्न जीवघेणे ठरत आहे. त्यामुळे महामार्ग अपघातांवर तोडगा निघेपर्यंत बंद ठेवावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, समृद्धीवरील क्रेन अपघात ही अगदी ताजी घटना आहे. या दुर्घटनेत २० जणांचा बळी गेलेला आहे. समृद्धी ही जीवघेणी झाली आहे. या मार्गावरून जाणाऱ्या ९० टक्के ट्रॅव्हल्सनी मार्ग बदलला असून फक्त १० टक्के ट्रॅव्हल्स आता मार्गावरून जात आहेत. हा महामार्ग काही काळासाठी बंद करून, त्यावर आवश्यक उपाययोजना करा. हा रस्ता राज्याच्या विकासात भर घालणारा रस्ता ठरावा असे फडणवीस यांचे स्वप्न होते. ते आता जीवघेणे स्वप्न झालेले आहे. या रस्त्यावर दर १५० ते २०० किमीवर फूड प्लाझा, रुग्णवाहिका, क्यु आर व्ही या सगळ्यांची व्यवस्था झाल्यावर तो पुन्हा सुरू करा, अशी सूचना वडेट्टीवर यांनी केली.
वडेट्टीवार म्हणाले की, पंतप्रधानांच्या हस्ते मार्गाचे उद्घाटन झाले असले तरी काही दिवस बंद करायला काय हरकत आहे? क्रेनच्या दुर्घटनेत २० लोकांचा जीव जातोय, याला जबाबदार कोण, या मार्गावर अजून किती लोकांचा जीव जाण्याची वाट बघताय, हा खरा प्रश्न आहे. म्हणून आम्ही स्थगन प्रस्ताव मांडला आहे. या रस्ते बांधकामात दोष आहेत का, ज्या तातडीने हा रस्ता बांधला. त्याच्या गुणवत्तेचे ऑडिट करून घ्या. त्याच्यातील संरचनात्मक दोष शोधून काढावे. तो पर्यंत समृद्धी महामार्ग बंद ठेवावा.’