मंत्रिमंडळाचा विस्तार आज सायंकाळपर्यंत
#मुंबई
ट्रिपल इंजिन म्हणवून घेणाऱ्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार गुरुवारी (दि. १३) संध्याकाळपर्यंत होणार असल्याचा ठाम दावा राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी बुधवारी (दि. १२) केला.
मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप तसेच जिल्हानिहाय पालकमंत्रिपद यांचा निर्णय गुरूवारी संध्याकाळपर्यंत झालेला असेल, असे सुनील तटकरे यांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्तार हा काही तिढा नाही. वरिष्ठ स्तरावरून हे निर्णय घेतले जाणार असल्याचेही त्सांनी नमूद केले.
तटकरे हे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘‘रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन आम्ही कधी आग्रही नव्हतो. या संदर्भात मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील.’’ जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीकडे आपण गांभीर्याने पाहत नाही. आम्ही सर्वांनी एकमताने आणि ताकदीने पुढे जाण्याचे ठरवले आहे, असेही तटकरे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथम मंत्रिमंडळ विस्तार करा आणि नंतर योग्यवेळी खातेवाटप करु, असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर खातेवाटपाची चर्चा सुरु झाली होती. त्यानुसार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांत मॅरेथॉन बैठका झाल्या. पण खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. वृत्तसंस्था