संग्रहित छायाचित्र
उपमुख्यमंत्री अजित पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या एका भाषणात बारामतीच्या मतदारांना लेकाला, बापाला, लेकीला निवडून दिले. आता सुनेला निवडून द्या, पवार आडनावाच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन केले होते. त्यावर "अजित पवार हे काहीही चुकीचे बोलले नाहीत. मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार, हा फरक ओळखा' अशा नर्मविनोदी शैलीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी कोटी केली होती.
शरद पवारांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना केलेल्या आवाहनावरून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी उत्तर देत त्यांच्या विनोदी शैलीत थेट सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यावर 'बाहेरून आलेल्या पवार' असल्याचा उल्लेख केला.
या वक्तव्यावरून पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला होता. मात्र आता या विधानावरून मोठे राजकारण होण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या लग्नाला ३९ वर्षे झाली तरीही सून बाहेरची कशी? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शरद पवारांना विचारला आहे.
या संबंधी एक व्हिडिओ अंजली दमानिया यांनी पोस्ट केला असून शरद पवारांचे विचार ऐकून वाईट वाटल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या व्हीडिओत अंजली दमानिया म्हणतात, शरद पवारांचं जे विधान आलं आहे त्यात त्यांना नक्की काय म्हणायचं आहे. एखादी सून लग्न होवून ३०, ४०, ५० वर्षे झाली तरीही ती घरची होत नाही? ती बाहेरची राहते? असं सवाल दमानिया यांनी केला. यापूर्वी आपली मुलगी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले होते की आपण मुलीला मुलासारखं ट्रीट करायचं. त्यावेळी त्यांचे विचार आवडले होते. परंतु आता या विधानानंतर माझ्यासारख्या मुली ज्या आता सुना झाल्या आहेत त्यांना हे अजिबात आवडणार नाही, असे दमानिया म्हणाल्या.