मंत्रिपद न मिळाल्यानेच कडूंचा एल्गार मोर्चा
#मुंबई
प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे सरकारला पाठिंबा दिला असला तरी ते मागील काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांनी अनेकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. या सर्व घडामोडीनंतर बुधवारी बच्चू कडू यांनी अमरावतीत एल्गार मोर्चा काढला आहे. त्यांच्या मोर्चावर राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी टीकास्त्र सोडले आहे. आपल्याला आता मंत्रिपद मिळणार नाही, हे बच्चू कडूंच्या लक्षात आले आहे. त्यामुळे हा मोर्चा म्हणजे बच्चू कडू यांचे दबावतंत्र असल्याचे विधान अनिल देशमुख यांनी केले.
मंत्रिपद न मिळाल्याने कडू नाराज आहेत, ही नाराजी मोर्चा काढून व्यक्त केली असल्याचा दावा करताना देशमुख यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. देशमुख म्हणाले, मी मागेही बोललो होतो. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे आमदार गेलेत, त्यांची अस्वस्थता आम्हाला माहीत आहे. अनेक आमदार विधानसभेत किंवा इतर ठिकाणी भेटतात, तेव्हा ते त्यांची अस्वस्थता बोलून दाखवतात. शिंदे गटातील आमदारांना वर्षभरापूर्वी आम्ही तुम्हाला मंत्री करू, असे आश्वासन दिले होते. पण त्यांनी आश्वासन पाळले नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले अनेक आमदार अस्वस्थ आहेत. भारतीय जनता पार्टीचे १०५ आमदार निवडून आले आहेत, पण यातील किती आमदार मंत्री झाले? यातील १०० आमदार अतिशय अस्वस्थ आहेत. तेही आम्हाला खासगीत भेटले की सांगतात, हे काय चालू आहे, आम्हाला समजत नाही. त्यामुळे बच्चू कडूंच्या लक्षात आले की, आपल्याला आता मंत्रिपद मिळणार नाही. त्यामुळे एल्गार मोर्चा हा बच्चू कडू यांचे दबावतंत्र असल्याचा निशाणा देशमुखांनी साधला आहे.
तीन महिने वाट पाहू अन्यथा...
आमची कुणाशी युती नाही झाली तरी आम्हाला त्याची परवा नाही. परंतु, मजूर, शेतकरी आणि वंचितांशी आम्हाला युती करायची आहे. ही केवळ सुरुवात आहे. आज आम्ही फक्त निवेदन देणार आहोत, कारण सरकार आपले आहे. माझा एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास आहे. कारण हा गरिबांचा माणूस आहे. त्याच विश्वासाने आम्ही आज परत जात आहोत. यानंतर आम्ही तीन महिने वाट पाहू. तीन महिन्यात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही अधिक आक्रमक भूमिका घेऊ, असा इशारा कडू यांनी दिला आहे.