संग्रहित छायाचित्र
राज्य सरकारने रेशनचे धान्य घेणाऱ्या ग्राहकांना आता ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. त्याबाबत अन्नपुरवठा कार्यालयास सूचना केल्या आहेत. शिधापत्रिकाधारकांनी आपल्या नजीकच्या धान्य दुकानदारांशी ही प्रक्रिया पूर्ण करण्याची माहिती करण्यात आली आहे. त्यामुळे धान्य वितरण करण्याबरोबर आता दुकानदारांना ई-केवायसी देखील करावे लागणार आहे. दोन्ही कामे कशी करायची, असा प्रश्न दुकानदार उपस्थित करत आहेत. त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
धान्य वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ई-केवायसी करताना कार्डधारकांच्या सर्व सदस्यांना दुकानदारांकडे जाऊन आधार क्रमांक जोडावा लागणार आहे. दुकानदारांना त्यांच्याकडील सर्व ग्राहकांचे ई- केवायसी युद्धपातळीवर करण्याचे आदेश पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात त्या अनुषंगाने दुकानदारांनी केवायसी करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी थंब इम्प्रेशन, आय स्कॅनर या तांत्रिक बाबींमुळे रास्त धान्य दुकानदाराच्या अडचणीत वाढ होत आहे. पुन्हा आता केवायसी करण्याच्या जबाबदारी देखील या दुकानदारांना देण्यात आली आहे.
दर महिन्याला अनेकांना धान्याचे वितरण करावे लागत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या अनेक तक्रारी आणि वेळेत भरण्याने मिळाल्याने त्यांची बोलणी खावी लागतात. त्यासाठी महिनाभर गडबड सुरू असते. ग्राहक, धान्य पुरवठादार आणि अन्नपुरवठा अधिकारी या सर्वांशी समन्वय राखावा लागतो. धान्य वितरणाचा ताण असतो. त्यामुळे धान्य वितरण करायचे की ई-केवायसी करायचे असा प्रश्न दुकानदारांकडून विचारला जात आहे. दुसरीकडे शहरात जवळपास तीन लाखाहून अधिक शिधापत्रिकाधारक आहेत. मात्र, दुकानांची संख्या घटली असून ती अवघी २४७ आहेत. इ पॉस मशिनमुळे दुकानदार आधीच त्रस्त असून, आता ही नवी जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.
शहरातील शिधापत्रिकाधारक लाभार्थी
चिंचवड- १ लाख २२ हजार
भोसरी- १ लाख ५ हजार
निगडी- १ लाख १० हजार
राज्य सरकारने रेशनवरील धान्याचे वितरण पारदर्शकपणे होण्यासाठी आता सर्व ग्राहकांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. आता आम्ही धान्य वितरण करायचे की ग्राहकांचे ई- केवायसी करून घ्यायचे कळत नाही. ई- केवायसीसाठी अधिकाऱ्यांनी विशेष शिबिरे राबवावीत.
- विजय गुप्ता, खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकीपर असोसिएशन