तुळजाभवानी मंदिर परिसरात आता सर्वांना ड्रेस कोड लागू
#सोलापूर
महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानल्या जाणाऱ्या तुळजाभवानी मंदिरात आता तोकडे कपडे घालणाऱ्या नागरिकांना प्रवेश मिळणार नाही. या आशयाचे फलक तुळजाभवानी मंदिर संस्थानने मंदिर परिसरात लावले आहेत. मंदिर परिसरात महाद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत विविध ठिकाणी असे फलक लावले आहेत. आता प्रशासनाच्या निर्णयानंतर नव्या वादाला राज्यात तोंड फुटण्याची शक्यता आहे. काहींनी प्रशासनाच्या या निर्णयाचा विरोध केला आहे.
तुळजाभवानी मंदिर संस्थानने मंदिर परिसरात लावलेल्या फलकावर अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पँट, बर्मुडा परिधान करणाऱ्या नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे म्हटले आहे. तसेच आपली भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचं भान ठेवा, अशी विनंतीही केली आहे.
२०१८ च्या ऑक्टोबरमध्ये नवरात्र उत्सव काळात कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराबाबत असाच निर्णय घेतला होता. शिर्डीमध्ये असे फलक लावले होते. मात्र, समाजातील अनेकांनी त्याला विरोध केल्यानंतर निर्बंध लादणारे फलक काढून टाकले. या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवण्याचे आवाहन करणाऱ्या फलकांवर असे म्हटले आहे की, गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना मंदिर परिसरात असभ्य कपडे घालण्यास बंदी आहे. असभ्य आणि अशोभनीय वस्त्रे घालून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. गुरुवार, १८ मे रोजी जिल्हाधिकारी तथा ट्रस्ट अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संस्कृती संदर्भात बोर्ड लावलेत. मंदिर परिसरात महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट घालून प्रवेश करता येणार नाही. महिलांनाच नव्हे तर पुरुषांना देखील शॉर्ट पॅन्ट घालता येणार नाही आहे. ड्रेसकोडबाबत मंदिराने कडक नियम घालून दिले आहेत.
बोर्ड काढा-तृप्ती देसाई
दरम्यान, कोणी कोणते कपडे घालावे, याचे व्यक्तिस्वातंत्र्य सर्वांना आहे, अशी प्रतिक्रिया भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिली आहे. भाविकांच्या भक्तीकडे आपण पाहिले पाहिजे. त्याच्या कपड्यांकडे पाहण्यात काय अर्थ आहे. ट्रस्टने लावलेला बोर्ड हा संविधानाचा अपमान आहे. तातडीने हा बोर्ड काढावा, अशी मागणी देसाई यांनी केली आहे.
मुलाला प्रवेश नाकारला
मात्र आता या नियमाच्या आधारे दर्शनाला आलेल्या कुटुंबातील एका सहा वर्षाच्या मुलाला प्रवेश नाकारला आहे. मुलाने बर्मुडा घातल्यामुळे प्रवेश नाकारला. सहा वर्षाच्या मुलाचे कपडे असभ्य कसे असतील, असा प्रश्न भाविकांनी उपस्थित केला आहे.