दानपेटीत दोन हजारांच्या नोटा टाकू नका : शिर्डी संस्थान
#अहमदनगर
केंद्र सरकारने दोन हजारांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे साई संस्थानच्या तिजोरीत या नोटांची आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिर्डी संस्थानने सर्वच साईभक्तांना या नोटा दानपेटीत टाकू नका, असे आवाहन केले आहे. यासाठी संस्थानच्या तिजोरीत कोट्यवधींच्या जुन्या नोटा पडून असल्याचा दाखला देण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी (दि. १९) दोन हजार रुपयांची नोट चलनातून काढून घेण्याची घोषणा केली. या नोटा नागरिकांना ३० सप्टेबरपर्यंत बदलून मिळणार आहेत. या निर्णयामुळे देशभरातील देवस्थानांच्या दानपेट्यांत मोठ्या प्रमाणात या नोटा टाकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डी संस्थानने साईभक्तांना या नोटा दानपेटीत न टाकण्याचे आवाहन केले आहे.
‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि. १९) दोन हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर झाला. पहिल्या नोटाबंदीपासून सुमारे तीन कोटींच्या जुन्या नोटा साई संस्थानच्या तिजोरीत पडून आहेत. या घटनेला आता ६-७ वर्षे लोटली आहेत. या नोटा बदलण्यासाठी रिझर्व्ह बँक व केंद्रीय गृह मंत्रालयाशी अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला. पण काहीच झाले नाही. या नोटा अजूनही संस्थानच्या तिजोरीत पडून आहेत. त्यामुळे भाविकांनी ३० सप्टेंबरनंतर दानपेटीत दोन हजाराच्या नोटा टाकू नये,’’ असे साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवा शंकर यांनी म्हटले आहे.वृत्तसंस्था