‘चांगले दिवस आले म्हणून संघर्षाचे दिवस विसरू नये’ - केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी टोचले आपल्याच पक्षातील नेत्यांचे कान

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आपल्या पक्षातील नेत्यांचे कान टोचले असून चांगले दिवस आले म्हणून जुने संघर्षाचे दिवस विसरता कामा नये, असे त्यांनी म्हटले आहे. गोव्यातल्या कार्यक्रमात गडकरींनी वरील विधान केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Mon, 15 Jul 2024
  • 11:14 am
Maharastra News, Bharatiya Janata Party, Nitin Gadkari, program in Goa, politics,

संग्रहित छायाचित्र

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आपल्या पक्षातील नेत्यांचे कान टोचले असून चांगले दिवस आले म्हणून जुने संघर्षाचे दिवस विसरता कामा नये, असे त्यांनी म्हटले आहे. गोव्यातल्या कार्यक्रमात गडकरींनी वरील विधान केले आहे. गडकरी हे रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गडकरी यांनी आत्तापर्यंत अनेकदा भाजपा नेत्यांचे तसेच कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत. पक्षातले वरिष्ठ नेते असोत किंवा मग कार्यकर्ते, पदाधिकारी असोत गडकरी कोणताही मुलाहिजा न ठेवता आपलं म्हणणं रोखठोक पद्धतीने मांडतात.

नितीन गडकरी म्हणाले, आपल्या पक्षात सध्या अनुकूल काळ सुरू आहे. ज्यावेळी शेतात हायब्रीड बियाणं लावलं जाते तेव्हा उत्पन्न वाढते. पण हायब्रीड बियाणाचा जितका वापर वाढतो किंवा ते जसं डेव्हलप होतं तशी झाडांवर रोगराई वाढते. वाईट दिवसांत आनंद होतो, चांगल्या दिवसांमध्ये घरं बरबाद होतात. समृद्ध आणि संपन्नतेच्या काळात सुख टिकवणं गरजेचं असतं. भविष्यातली उद्दिष्ट लक्षात ठेवून काम केलं पाहिजे. आपल्या पक्षात जे संस्कार आहेत, ते शॉर्टकट नाहीत. लालकृष्ण आडवाणी हे कायम म्हणायचे, वुई आर पार्टी विथ डिफरन्स. भाजपा आणि काँग्रेसमध्ये फरक काय? आपण तेच काम केलं तर आपल्या येण्याचा फायदा काय? आपले वेगळेपण लक्षात ठेवलं पाहिजे. ज्यांच्यावर नाराज होऊन आपल्याला लोकांनी निवडून दिलं आहे, निवडून आल्यानंतर आपण जे काम करायला नको ते केलं तर त्यांच्या (काँग्रेस) जाण्यात आणि आपल्या येण्यात काय फायदा आहे, असाही प्रश्न गडकरींनी विचारला. चांगले दिवस आले की जुन्या काळातली प्रतिकूल परिस्थिती आणि संघर्ष आपण विसरतो. मराठी भाषेत एक प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांचं नाव शिवाजी सावंत. त्यांनी मृत्युंजय पुस्तकात एक सुंदर वाक्य लिहिलं आहे. विस्मृती ही माणसाला देवाने दिलेली देणगी आहे. आयुष्यातल्या कटू गोष्टी विसरता आल्या पाहिजेत. पण पुढे ते म्हणतात, भविष्यात काही चांगलं करायचं असेल तर भूतकाळातल्या घटना आठवून वर्तमानकाळात त्याचं चिंतन केलं पाहिजे आणि मग भविष्याचे निर्णय घेतले पाहिजे. आपल्या पक्षात सध्या अनुकूल काळ आहे. मात्र आपण संघर्ष विसरायला नको, असे गडकरी म्हणाले. गोव्यातल्या सभेतले गडकरींचे भाषण आणि त्यांनी दिलेली दोन उदाहरणे चर्चेत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest