मनात संभ्रम ठेवू नका, आपण भाजपसोबत नाहीच
#दिल्ली
'मनात कोणीही संभ्रम ठेऊ नका. आपण भाजपबरोबर जाणार नाही. आपल्याला भाजप विरोधातच लढायचे आहे', अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडली आहे. ते मंगळवारी दिल्लीत बोलत होते.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार भाजपसोबत जाऊ शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. फुटीनंतर पहिलीच सभा छगन भुजबळांचा मतदारसंघ येवल्यात घेत शरद पवारांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर अजित पवार गटाने शरद पवार यांची भेट घेतली व शरद पवारही मवाळ झालेले दिसले. अशातच कालच राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयकावर मतदान झाले. मात्र, त्यासाठी कोणताही व्हीप राष्ट्रवादी पक्षाकडून बजावण्यात आला नाही. त्यामुळे शरद पवारांच्या भूमिकेबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला.
शरद पवारांच्या भूमिकेबाबत केवळ सामान्यच नव्हे तर पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावत आपली भूमिका स्पष्ट करत पदाधिकाऱ्यांच्या मनातील शंका-कुशंका दूर करण्याचा प्रयत्न केला.
बैठकीत पदाधिकाऱ्यांना शरद पवार म्हणाले, 'पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याबाबत केंद्राकडून दबाव टाकला जात असल्याची माहिती आहे, पण काहीही झाले तरी आपण पुन्हा सगळे उभे करू. काहीही झाले तरी आपण तडजोड करणार नाही, आपल्याला भाजप विरोधातच लढायचे आहे. मनात कोणीही संभ्रम ठेवू नका. आपण भाजपबरोबर जाणार नाही. मनात कुठेही शंका आणू नका. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची बांधणी करा.'
मागच्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आले होते. त्या वेळी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर होते. त्यावरूनही शरद पवार यांना लक्ष्य केले जात असून, त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. त्यामुळे त्यांनी भूमिका मांडली.